ठाण्यात कुमारांच्या कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

| ठाणे | प्रतिनिधी |

कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला असल्याने व हा मातीचा खेळ असल्याने कबड्डी खेळाडूं मातीवर खेळतात. या खेळाचा सराव मातीवर तर करतात, त्याचबरोबर या खेळाडूंनी सिंथेटिक रबर मॅटवर खेळले पाहिजे, जिल्हा संघटनांनी त्यांचा सराव देखील मॅटवर करून घेतला पाहिजे. यासाठी सर्व जिल्हा संघटनांनी खेळाडूंना सिंथेटिक रबर मॅट उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशा अपेक्षा खासदार गजानन किर्तीकर यांनी ठाणे येथे व्यक्त केल्या. ते येथील धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरीत राज्य स्तरीय मुख्यमंत्री चषक कुमार-कुमारी गट अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

येथील स्वर्गीय आनंद दिघे क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विठ्ठल क्रीडा मंडळ व प्रशांत जाधवर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 50 वी सुवर्ण महोत्सवी मुख्यमंत्री चषक कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खा. गजानन किर्तीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. रवींद्र फाटक, ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख व ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबुराव चांदेरे, ठाणे जिल्हा कबड्डी अशोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, सचिव मालोजी भोसले, परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, माजी नगरसेवक उमेश पाटील, दिलीप बारटक्के, पोलीस उपायुक्त अमरजीत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल देशमुख, क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे, राज्य संघटनेचे खजिनदार मंगल पांडे व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व कार्यकारणी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत हनुमंत जगदाळे यांनी केले, तर बाबुराव चांदेरे यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेत किशोर 31 व किशोरी 31 संघांसह 1250 खेळाडू व पदाधिकारी, प्रशिक्षक व व्यवस्थापक सहभागी झाले आहेत. पोलीस बँडच्या तालावर खेळाडूंनी संचलन केले व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते.

Exit mobile version