कुणाल हर्णेकरची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड

जिद्द,कष्ट आणि स्वप्नपूर्तीचा भावनिक प्रवास

। माणगाव। प्रतिनिधी।

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कालवण या छोट्याशा गावातून मोठ्या स्वप्नांची उंच भरारी घेणाऱ्या कुणाल सुरेश हर्णेकर याची थेट महाराष्ट्र कबड्डी संघात निवड होणे ही संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातील मर्यादित साधनांवर मात करत, कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर कुणालने हे यश संपादन केले आहे.

कुणाल सध्या सतेज संघ, बाणेर (पुणे) या संघाकडून कबड्डी खेळत असून, 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान पुणे येथे झालेल्या 51व्या राज्य अजिंक्य निवड चाचणी स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत पुणे जिल्हा पुणे शहर विभागातून निवड होऊन त्याने आपल्या खेळाची चुणूक दाखवली. त्याच जोरावर त्याची आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे 15 ते 18 जानेवारी दरम्यान होणाऱ्या 51व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. कुणालचा शैक्षणिक प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. त्याचे पहिली ते तिसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण रायगड जिल्हा परिषद शाळा, कालवण येथे झाले. पुढे चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण राजा शिवाजी विद्यालय, नालासोपारा (मुंबई) येथे घेतले. सध्या तो अकरावी ते तेरावीचे शिक्षण अभिनव कॉलेज, भाईंदर (मुंबई) येथे घेत असून, शिक्षण आणि खेळ यांचा समतोल साधत तो पुढे वाटचाल करत आहे. कुणालच्या या यशामागे त्याचे अथक कष्ट, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, शाळा महाविद्यालयातील शिक्षकांचे पाठबळ आणि कुटुंबीयांचा विश्वास मोलाचा ठरला आहे. अनेक अडचणी, आर्थिक मर्यादा आणि ग्रामीण भागातील वास्तव असूनही कुणालने कधीही हार मानली नाही. प्रत्येक सरावात, प्रत्येक सामन्यात त्याने स्वतःला सिद्ध करण्याचा ध्यास घेतला आणि आज त्याचे स्वप्न साकार झाले आहे. कुणाल हर्णेकरची महाराष्ट्र संघात झालेली निवड ही केवळ वैयक्तिक यश नसून, कालवण गावातील आणि रायगड जिल्ह्यातील असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे. “जिद्द, मेहनत आणि विश्वास असेल तर गावातूनही राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचता येते,” हे कुणालने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे. कुणालच्या या दैदीप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राच्या संघाला यशाच्या शिखरावर नेईल, अशी आशा सर्वत्र व्यक्त होत आहे.

Exit mobile version