रायगडचे कुणाल, अथर्व ‌‘पॉवरफुल्ल’

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक
| मुंबई | प्रतिनिधी |
फोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्पोर्ट्‌स अथोरिटी ऑफ इंडिया नॉर्थ गोवा येथे राष्ट्रीय सब ज्युनिअर ज्युनिअर, सीनियर (पुरुष व महिला) पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा दि. 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीमध्ये संपन्न झाली. या स्पर्धेत रायगडच्या कुणाल पिंगळे, अथर्व लोदी यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे. या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

महाराष्ट्राच्या संघातून रायगड जिल्ह्याचे ज्युनिअर पुरुष 53 किलो वजनी गटात कुणाल पिंगळे (लोखंडे जिम, खोपोली) याने एकूण 415 किलो वजन घेतले. त्यामध्ये स्कॉट प्रकारात 145 किलो बेंच प्रेसमध्ये 95 किलो आणि डेडली प्रकारात 175 किलो वजन उचलत सुवर्णपदक प्राप्त केले.

सब ज्युनिअर 83 किलो वजनी गटात अथर्व लोदी (संसारे फिटनेस, पेण) याने 535 किलो वजन उचलत सुवर्णपदक प्राप्त केले. अथर्वने स्कॉट प्रकारात 192.5 बेंचमध्ये 100 किलो आणि डेडलिफ्टमध्ये 242.5 असे वजन उचलले.

कुणाल पिंगळे आणि अथर्व लोधी यांच्या यशाबाबत पॉवर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक, सचिव अरुण पाटकर, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव, खजिनदार राहुल गजरमल आणि माधव पंडित, सुभाष भाटे, दत्तात्रय मोरे, सुभाष टेंबे, संदीप पाटकर, मानस कुंटे आदींनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंगचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय प्रतापराव सरदेसाई यांनीसुद्धा खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version