| अलिबाग | प्रतिनिधी |
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात कुणबी समाजाच्यावतीने जिल्ह्यातील तहसील कार्यालयांवर सोमवारी (दि.15) मोर्चा काढण्यात आला. यावेळी कुणबी आरक्षणातील मराठ्यांच्या घुसखोरीचा निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्यामुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असून, हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या संस्थेच्या माध्यमातून तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी अलिबागमधील तहसीलदार विक्रम पाटील यांनाही निवेदन देण्यात आले.
यावेळी कुणबी समाजाच्या आंदोलनात ओबीसी संघटनांही पाठिंबा दिला असून ओबीसी संघटनांचेही पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुणबी समाजातील नेत्यांनी थेट मराठा समाजावर ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा आरोप केला आहे. मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला नसल्याचे सांगत त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देणे हे अन्यायकारक असल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे. त्यामुळे मूळ ओबीसी समाजाला नोकरी आणि शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहावे लागेल, अशी भीती व्यक्त केली. सरकारने हैदराबाद गॅझेटमधील नोंदी तपासण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कुणबी समाजाच्या नेत्यांचा आरोप आहे की, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रे वापरली जात आहेत. केवळ काही जुन्या नोंदींच्या आधारे सरसकट कुणबी प्रमाणपत्रे दिली जात असून, हे आरक्षणाच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात आहे. यासह शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळास स्वतंत्र दर्जा देवून त्यास 1500 कोटी रुपयांची भरीव तरतूद करावी, खोताच्या जमीनी कसणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांच्या नावे जमीनी कराव्यात. मुंबई-गोवा महामार्गाचे काम त्वरीत पूर्ण करुन या महामार्गाला कोकणचे लोकनेते स्व. शामराव पेजे यांचे नाव द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.







