अल्पेश पाटील उपसरपंच म्हणून बिनविरोध
अपूर्ण अर्ज दाखल केल्याने विरोधकांचे अर्ज अवैध
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून शेकापच्या कुंदा राजाराम गावंड शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारला. उपसरपंच म्हणून अल्पेश पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यामुळे चिंचवलीमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
कुंदा गावंड यांनी सरपंचपदाची धुरा शुक्रवारी हाती घेतली. त्यावेळी उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले होते. परंतु विरोधकांनी त्यांच्या अर्जावर अपूर्ण माहिती दिल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आला. त्यामुळे शेकापचे अल्पेश पाटील यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य राजाराम गावंड, नरेश पाटील, सर्वेश ठाकूर, राजेश्री वाघमारे आदी उपस्थित होते. सरपंच व उपसरपंच यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.