राणांविरोधात महायुतीत कुरघोडी

| अमरावती | वृत्तसंस्था |

नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अमरावतीतल्या महायुतीतले वाद समोर यायला लागले. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी आधीपासूनच नवनीत राणांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतली. तर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही अमरावतीतून उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. नवनीत राणा यांच्याविरुद्ध दिनेश बुब उमेदवार असतील अशी घोषणा प्रहार संघटनेने केली आहे. त्यातच आता संजय खोडके यांनीही नवनीत राणा यांना आव्हान दिलं आहे.

‘अमरावती लोकसभा निवडणुकीच्या आपल्या प्रचाराच्या पोस्टरवर आपण माझा फोटो लावला असल्याचे मला समजले असून सोशल मीडियावर सुद्धा वायरल केला जात आहे. सोशल मीडियावर किंवा पोस्टरवर माझा फोटो लावण्याची मला काहीही कल्पना नसून आपण माझा फोटो सोशल मीडियावर किंवा पोस्टरवर वापरण्याबाबत माझी व्यक्तिगत अनुमती सुद्धा घेतलेली नाही. हि बाब निवडणूक आदर्श आंचार संहितेचे उल्लंघन करणारी आहे. करिता आपणास विनंती आहे की , लोकसभा निवडणुकीत माझ्या फोटोचा व नावाचा वापर करू नये, आपण माझ्या फोटोचा वापर ज्या-ज्या मीडियात केलेला आहे तेथून त्वरित काढून मीडियामध्ये त्या संदर्भात आपण आपले निवेदन सोशल मीडिया व प्रिंट मीडियामध्ये करावे. जर याबाबत आपण माध्यमांमाधून निवेदन ( खुलासा ) केले नाही तर मला कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल,’ असा इशारा संजय खोडके यांनी नवनीत राणांना दिला आहे.

Exit mobile version