वाढीव मोबदल्याविरोधात कामोठेकर एकवटले

। पनवेल । वार्ताहर ।

सिडको आणि काही विकासकांच्या हातमिळवणीमुळे जमिनीचा वाढीव मोबदला गुंता वाढला आहे. नवी मुंबईतील गृहसंस्थांना मनस्ताप सहन करावा लागत असून कामोठेतील एकता सामाजिक संस्थेने भ्रष्ट यंत्रणा विरोधात दंड थोपटले आहेत.

मागील काही वर्षात काही प्रकल्पग्रस्त शेतकरी, विकासकांनी सिडकोतील अधिकार्‍यांशी हातमिळवणी केल्यामुळे जमिनीचा वाढीव मोबदला अर्थात मावेजाचा प्रश्‍न चव्हाट्यावर आला आहे. भूधारक साडेबारा टक्के योजनेचे भूखंड विकासकाला विकून मोकळे होतात. विकासक इमारत बांधून ग्राहकाला विक्री करतो, मात्र भूखंडाच्या लीज प्रीमियमच्या फरकाची रक्कम न भरल्याने गृहनिर्माण संस्थांची अडवणूक केली जाते.

हस्तांतरण, अभिहस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सिडकोचे सहकार्य मिळत नाही. याविरोधात एकता सामाजिक संस्थेने कामोठेत जनजागृती अभियान सुरु केले असून नंदकृपा सोयायटीच्या आवारात बैठक पार पडली. यावेळी अमोल शितोळे, अल्पेश माने, अजिनाथ सावंत, बाळासाहेब सकपाळ, ऍड. प्रमोद मोरे, काशिनाथ जाधव, प्रकाश कुलकर्णी यांनी अभिहस्तांतरण व मावेजा बद्दल मार्गदर्शन केले.

काही विकासक व सिडको यांचे साटेलोटे असल्यामुळे कामोठेतील गृहनिर्माण संस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरिकांना जागरूक करण्यासाठी एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कामोठेत जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार अमोल शितोळे यांनी केला.

Exit mobile version