दोन लहान मुलांसह पाच जणांचा मृत्यू
। जळगाव । प्रतिनिधी ।
जळगावच्या एरंडोल तालुक्यात बुधवारी (दि. 20) पहाटे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. एरंडोल तालुक्यातील वारखेडी गावात एका शेताभोवती तारेचे कुंपण घातले होते. शेतात कोणी शिरु नये म्हणून मालकाने या कुंपणात वीजेचा प्रवाह सोडला होता. या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे एकाच कुटुंबातील दोन महिला, पुरुष आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. तर एक चिमुकली थोडक्यात बचावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वारखेडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेताचे पिके वन्यप्राण्यांपासून वाचवण्यासाठी शेताच्या भोवती लोखंडी तारांचे कुंपण घातले होते. याच शेतात मजुरीचे काम करणारे पावरा कुटुंब मुक्कामाला थांबले होते. मात्र, दुर्दैवाने या विजेच्या प्रवाहाची कल्पना नसलेल्या मजुर कुटुंबाचा या कुंपणाशी संपर्क आला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. यात मजूर कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये आई, मुलगा, सून आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर एक वर्षांची चिमुकली वाचली आहे. या अपघाताची माहिती मिळताच गावात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी तसेच, तहसीलदार प्रदिप पाटील यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.







