| आगरदांडा | प्रतिनिधी |
परतीच्या पावसात काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने बळीराजावर संकट आले असले तरीसुद्धा तो भातकापणी करण्यात व्यस्त झाला आहे. परंतु, वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असून, भातकापणीच्या वेळी मजूर हैराण झाले आहेत.
दरम्यान, शेतमजुरांच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी आजही शेतीची कामे खोळंबली असून, मजुरांची मनधरणी करुन भात कापणीसाठी सुरुवात झाल्याचे तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. दिवसेंदिवस वातावरणात उष्णतेच्या प्रमाण वाढत असल्यामुळे शेती करण्यासाठी मजूर मिळणे कठीण बनले आहे. शेतीची काम मजुरांवर अवलंबून आहेत, परंतु स्थानिक शेतमजुरांची दिवसेंदिवस कमी होत असलेल्या संख्येमुळे शेतमजुरांचा तुटवडा जाणवत आहे.
पंचक्रोशी भागातून येणारे मजूर हे दिवाळीपूर्वी मिळतात. जे उपलब्ध होतील त्यांची मनधरणी करून लवकरात लवकर भातकापणी आटोपून घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहे. दिवसभरातील कडक उन्हामुळे शेतमजूर हैराण होत असल्यामुळे या भातकापणीकडे पाठ फिरवत आहे. त्यातच भातामधील तांदळाचा दाणा टणक बनून तो तुटण्याची शक्यता अधिक असल्याने ठराविक वेळेत भातकापणीला झाली नाही, तर शेतकर्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे.