। दाभोळ । वृत्तसंस्था ।
दापोली तालुका हा पर्यटकांची पहिली पसंती असलेला तालुका म्हणून ओळखला जात असला तरी, शासकीय अनास्थेमुळे व राजकीय इच्छाशक्तीअभावी तालुक्यातील पर्यटन व्यवसायाचा विकास झालेला नसल्याने पर्यटन व्यवसायात उतरलेले व्यावसायिक नाराज आहेत. दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून पर्यटन व्यवसाय फोफावला आहे. मात्र सरकारची साथ अगदी अल्प आहे. पायाभूत सुविधांचा अभाव आणि घोषणांचा सुकाळ अशी तालुक्याची अवस्था आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड, कर्दे, सालदुरे, कोळथरे, दाभोळ, आंजर्ले, आडे, केळशी आदी ठिकाणी असलेला स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारे असलेल्या गावांमध्ये मुंबई, पुणे व देशातील तसेच विदेशातील पर्यटकही कायम येत असल्याने या पर्यटकांना चांगली सेवा मिळावी, यासाठी अनेक पर्यटन व्यावसायिक तयार झाले आहेत. पर्यटकांच्या दर्जाप्रमाणे त्यांना परवडतील, अशी रिसॉर्ट बांधली आहेत. पर्यटकांसाठी समुद्रकिनारी साहसी खेळ, समुद्रसफरी, डॉल्फिन दर्शन आदी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. येथे पर्यटन व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असूनही राजकीय व शासकीय अनास्थेमुळे या भागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही.
या भागात जाण्यासाठी ना चांगले रस्ते, योग्य दाबाने वीजपुरवठा होत नाही, मोबाईलची रेंज नाही अशा अनेक समस्यांना येथील पर्यटन व्यावसायिकांना तोंड द्यावे लागत आहे. दापोली तालुक्याचा विकास हा इतर कोणत्याही उद्योगापेक्षा पर्यटन उद्योगाद्वारे चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तालुक्यातील युवाशक्तीला पर्यटन व्यवसायामुळे गावातच रोजगार मिळू लागला आहे. मात्र तालुक्यातील पर्यटन व्यवसाय हा आठवड्यातील दोन ते तीन दिवस चालतो. वर्षातील किमान 180 पेक्षा जास्त दिवस हा व्यवसाय सुरू राहिला तर येथील पर्यटन व्यावसायिकांना चांगले दिवस येतील.