भटक्या श्वानांचा वाढता वावर; अनधिकृत वाहनतळावर अधिकृत वसुली
। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।
हार्बर मार्गावरील खान्देश्वर रेल्वे स्थानकात सध्या भटक्या श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनसा येत आहे. या श्वानांमुळे स्थानकात येणार्या प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून, स्थानिक प्रशासनाने या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात दररोज कामानिमित्त जाणार्यांची संख्या मोठी आहे. सिडको आणि रेल्वेच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या या स्थानकातुन कामोठे, कळंबोली, तळोजा, खांदा वसाहत आणि नवीन पनवेलमध्ये राहणार्यांची मोठी वर्दळ असते. हे स्थानक त्यांना वाहतुकीसाठी सोयीचे असल्याने येथील बहुतांशी प्रवासी याच स्थानकात उतरतात. दररोज 7 ते 8 हजार प्रवासी या स्थानकावरून प्रवास करीत असून 5 लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळते. दिवसेंदिवस स्थानकातील प्रवाशांची संख्या वाढत आहे. रेल्वे स्थानकावरून कामोठे वसाहत, नवीन पनवेलकरिताही एनएमएमटीच्या फेर्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानकात प्रवाशांची संख्या वाढत असली तरी स्थानकात सुविधांचा अभाव असल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.
भुयारी मार्गात गुडघाभर पाणी
खान्देश्वर रेल्वे स्थानक समुद्र सपाटीपासून 3 मीटर उंचीवर आहे. असे असतानाही स्थानकात जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गात पावसाळ्यात गुडघाभर पाणी साठत असल्याने प्रवशांना स्थानक गाठण्यासाठी साचलेल्या पाण्यातून जावे लागते. ‘नियोजनबद्ध शहरांचे शिल्पकार’ अशी नवी मुंबईची ओळख आहे. मात्र, रेल्वेस्थानकातून प्रवास केल्यावर सिडको महामंडळाचा हा दावा फोल ठरत असल्याचे बोलले जात आहे.
फेरीवाल्यांकडून मीटर रूमचा वापर
हार्बर मार्गावरील इतर स्थानकांप्रमाणेच खान्देश्वर रेल्वे स्थानकात देखील फेरीवाल्यांचा मुक्त वावर आहे. गंभीर बाब म्हणजे हे फेरीवाले स्थानकात असलेल्या विजेच्या मीटर रूमचा वापर आपले साहित्य ठेवण्यासाठी करत आहेत.
दोन वर्षांपूर्वी पाणपोईची सफाई
स्थानकात पाणी पिण्यासाठी पाणपोईची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, या ठिकाणी पाणी साठवणूक करण्यासाठी वापरात असलेल्या टाक्यांची साफसफाई 2023 साली करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात पाणी साठवणूक करण्यासाठी वापरात असलेल्या टाक्यांची सफाईच करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पार्किंगचा अभाव
रेल्वे स्थानक परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेचे काम सुरु असल्याने येथील काही वाहनतळ बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेले वाहनतळ कमी पडत असून, वाहन चालकांना रस्त्यावर किंवा नो पार्किंग म्हणून घोषित जागेवर आपली वाहने उभी करावी लागत आहेत. परिणामी उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर वाहतूक विभागाचे कर्मचारी कारवाई करत असल्याने वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
अनधिकृत वाहनतळावर अधिकृत वसुली
खान्देशवर स्थानकात प्रवेश करण्यासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या दिशेने असलेल्या मार्गावर अनधिकृत पणे वाहनतळ चालवले जात आहे. सिडको अथवा इतर कोणत्याही प्रशासनाची परवानगी न घेता या ठिकाणी वाहने उभी करून त्यांना बानावट पावत्या देऊन शुल्क वसुली केली जात आहे.