बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत सुविधांची वाणवा

। उरण । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील आनंदनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत नागरिक, जेष्ठ महिला, आबाल वृद्ध, विद्यार्थी यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हि बाब अ‍ॅड. नवाळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आनंदनगरमध्ये मिळणार्‍या अपुर्‍या सेवा सुविधांबाबत आवाज उठवला आहे. यावेळी त्यांनी बँकेत नागरिकांना चांगल्या व त्वरित सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी संबंधित प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे.

गेल्या सहा महीन्यांपासुन आनंदनगर येथे ही शाखा स्थलांतरीत करण्यात आली आहे. यापुर्वी या शाखेत 15 ते 20 कर्मचारी कार्यरत होते. परंतु, आता तेथे फक्त 5 कर्मचारी काम करीत असल्याने ग्राहकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गर्दीच्या वेळी शाखेमधे उभे राहण्यास सुद्धा जागा नसते. बँकेत रक्कम देणे व घेण्याकरीता एकच कांऊटर उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना एकाच रांगेत अर्धा ते पाऊण तास उभे रहावे लागते. तेथे बसण्याची सोयसुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे ग्राहकांना एटीएम मशीनकडे धाव घ्यावी लागते. परंतु, बँकेने लावलेल्या एटीएम मशीनमध्ये कधी 2 ते 3 दिवस रक्कमच उपलब्ध नसते. त्यामुळे ग्राहकांना बाहेरील बँकांच्या एटीएमकडे धाव घ्यावी लागते. त्याचा ग्राहकांना आर्थीक भुरदंड बसतो. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक जनतेच्या हितासाठी आहे की जनतेला लुटुन धंदा करण्यासाठी आहे, असा प्रश्‍न सध्या येथील ग्राहकांना पडला आहे.

Exit mobile version