शेतीच्या कामाला मजुरांची वानवा

शासनाकडून उपाययोजना राबवण्याची मागणी

। म्हसळा । वार्ताहर ।

तालुक्यात उशिरा पावसाच्या आगमनामुळे रोपांची वाढ आवश्यक त्या प्रमाणात न झाल्याने आणि त्यातच 80% लोकांचे स्थलांतर झाल्याने तालुक्यात शेतीच्या कामाला मजुरांची कमतरता भासू लागली आहे.

शासनाच्या चुकीच्या कृषी धोरणांमुळे शेतकर्‍यांना शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. यामुळी स्थानिक शेतकर्‍याला शेती करण्यात काडीचाही रस राहिला नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. यामुळे येथील तरूण वर्ग कामासाठी शहराकडे वळत आहेत. नाहिलाजाने त्यांच्या मागोमाग कुंटुंबालाही राहते घर सोडून शहरात जावे लागत आहे. यातच आता रोपे लावणीस तयार झाली असून लावणीच्या कामाची प्रतीक्षा शेतकर्‍यांना लागली आहे. परंतु, एकाच वेळी सर्वत्र लावणी सुरु झाल्यामुळे तसेच स्थानिक लोकांच्या स्थलांतरामुळे शेत मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे शेत मजुरांच्या मागणीत वाढ झाली असल्याने ते अवास्तव मजुरीची मागणी करतील याची चिंताही दिवसेंदिवस जाणवु लागली आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी स्वतः शेतात उतरून शेती करू लागल्याचे चित्र निर्माण झोले आहे.

पुर्वी शेतकरी मेहनत करून शेतीतून तीन-चार खंडी भात, पाच-दहा मण नाचणी, वरीची पिके घेऊन सुजलाम सुफलाम राहण्याचा प्रयत्न करीत असे. पंरतु आता आषाढी एकादशीला उपवास सोडायला लागणारी वरीची भाकरी दिसेनाशी झाली आहे. नाचणीची भाकरी तर कोणाच्या नजरेस हि पडत नाही. याला महत्वाचे कारण म्हणजे केल्टी, माकडे आणि रानडुकरांचा वाढता उपद्रव कारणीभूत आहे. यासाठी वनविभाग हि तेवढेच जबादार असल्याचे बोलले जात आहे. शेती, पिके यांचे संरक्षण व्हावे या दृष्टीकोनातून एकही उपाययोजना वनविभागाकडून राबविली जात नाही. त्यात सरकारकडून मिळणारे आयते धान्य हेही महत्वाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. यासाठी शेती केंद्रित योजना शासनाने राबविल्या पाहिजेत, जेणेकरून कमी कष्ट आणि उत्पन्न जास्त हाऊन पूर्वीचे वैभव प्राप्त होईल.

भाताच्या पेरणीनंतर आता रोपांची वाढ लावणीलायक झाली आहे. पावसाअभावी लावण्या लांबल्यास मजूर मिळणे कठीण होईल. मजुरीही वाढेल आणि त्यामुळे लावण्या अजून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

महादेव पाटील, शेतकरी
Exit mobile version