कचराभूमीअभावी गावांचा कचरा रस्त्यावर


35 ग्रामपंचायतींच्या हद्दीत दररोज 40 टन कचरा जमा
| उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायत हद्दीत दररोज 40 टन कचरा जमा होत असून या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कचराभूमी नसल्याने रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. यामुळे हवेत दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
उरण शहर वगळता ग्रामीण भागातील लोकसंख्या सव्वा लाखांच्या आसपास आहे. ही सव्वा लाख लोकसंख्या तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींमध्ये विखुरलेली आहे. या 35 ग्रामपंचायतींमध्ये काही सधन तर काही आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती बिकट असलेल्या ग्रामपंचायतींकडे स्वच्छतेच्या कामासाठी सफाई कामगारांचीही वानवा आहेच. त्याशिवाय दररोज जमा होणारा कचरा वाहतुकीसाठी वाहनांची कमतरता भासत आहे.

तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या हद्दीत दररोज साधारणपणे 40 टन कचरा जमा होतो. यामध्ये प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, ओल्या-सुक्या कचर्‍याचा समावेश असतो. दररोज जमा होणारा कचरा जमा करण्यासाठी काही ग्रामपंचायतींकडे कचरा कचराकुंड्यांच नव्हे तर वाहतुकीची साधनेही नाहीत. मात्र काही ग्रामपंचायतींकडे कचराकुंड्या, घंटागाड्या, ओला-सुका कचरा वाहून नेण्यासाठी बंदिस्त कचरा गाड्याही उपलब्ध आहेत. मात्र कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी कचराभूमीच नाही. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त कचरा टाकला जात आहे. कधी खाडी किनार्‍यावरील खारफुटी, कांदळवनावर तर गावाबाहेरच्या एखाद्या रस्त्याच्याकडेला कचरा टाकला जात आहे. काही ग्रामपंचायतींकडे कचरा टाकण्यासाठी पर्यायच उपलब्ध नसल्याने कचरा जाळून नष्ट केला जात आहे. कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कचराभूमीची नितांत आवश्यकता आहे. त्याशिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वच्छता व कचरा वाहतुकीसाठी एक घंटागाडीची गरज आहे. सध्या 22 घंटागाड्या आहेत. सफाई कामगारांची कमतरता आहे. ग्रामस्वच्छतेसाठी या बाबी उपयुक्त आहेत. कचराभूमीसाठी ग्रामपंचायतीकडून नव्याने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

Exit mobile version