नागरिकांना वारंवार मारावे लागतात हेलपाटे
| तळा | वार्ताहर |
तळा भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांची वानवा असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. महसुलीचे हे महत्वाचे कार्यालय असून तालुका निर्मिती नंतर जवळपास दहा वर्षानंतर स्थापन झाले तेव्हापासून रिक्त पदे भरली गेली नसल्याने त्या पदांचा भार इतर कर्मचारी खांद्यावर घेऊन कसे तरी कारभार सांभाळत आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा निपटारा होत नसल्यामुळे नागरिकांना एका कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. या कार्यालयात एकूण तेरा पदे मंजूर असून सद्यस्थितित शिपाई, भूमापक व उपअधीक्षक हे तिघेच कार्यरत आहेत. तालुका डोंगराळ, दुर्गम असल्याने ग्रामीण भागातील जनता आपल्या कामानिमित्त या कार्यालयात येत असते.
या कार्यालयात महत्त्वाचे भूकरमापक, नगर भूमापक, प्रतिलिपी, आवक जावक, लिपिक, दप्तर बंद, शिपाई अशी दहा पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर कामे खोळंबली जात आसून नागरिकांना वेळ व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या कार्यालयात मोजमापणी, फेरफार, वारसनोंद, फेरबदल, नकाशा, जुनी कागदपत्रे व इतर अनेक कामे केली जातात. जमीन मापणीचे पैसे भरून देखील सहा-सहा महिने कामे होत नसल्यामुळे जनतेला मनःस्ताप सहन करावे लागत आहे. याबाबत जिल्हाधिकारी, संचालक भूमिअभिलेख, कोकण विभाग मुंबई व जिल्हा भूमी अभिलेख यांनी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.