| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |
गणेशोत्सवानंतर ऑक्टोबर महिन्यात मुरूड-श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची वर्दळ वाढेल अशी अटकळ सपशेल फोल ठरली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या महिन्यातदेखील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचा शुकशुकाट दिसून येत असून, ही परिस्थिती खरी असल्याची माहिती मुरूड येथील हिरा रेसिडेन्सीचे मालक महेंद्र पाटील यांनी दिली. मुरूड तालुक्यातील प्रसिध्द काशीद समुद्रकिनारी या हंगामामध्ये गजबजलेला असतो. परंतु या ठिकाणीदेखील शुक्रवारी पर्यटकांची वर्दळ दिसून आली नाही.
श्रीवर्धन येथील डॉ. आदित्य पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सवानंतरदेखील श्रीवर्धन परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर फारसे पर्यटक दिसून आले नसून, ऑक्टोबर महिन्याच्या शनिवारीदेखील पर्यटकांचा मागमूस दिसून येत नाही. या हंगामामध्ये प्रसिद्ध काशीद बीचवर ज्यावेळी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. त्यावेळी जंजिरा किल्ला, मुरूड बीच, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर आदी समुद्रकिनारे फुलून जात असतात. परंतु सध्या पर्यटक समुद्र किनारपट्टीत का आले नाहीत, हा प्रश्न आहे.
सध्या शालेय परीक्षा सुरू असल्याने पर्यटक आले नसावेत असे मत या क्षेत्रातील काही मंडळींनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे या समुद्र किनारपट्टी भागात रुंद आणि खड्डे मुक्त रस्त्यांची मोठी गरज पर्यटकांतून सातत्याने व्यक्त होत असते. मुंबई-गोवा महामार्गावर हाजारोंच्या संख्येने खड्डे अद्याप तसेच आहेत. या खड्यांमुळे तिकडे गेलेल्या आणि येथे हमखास भेट देणाऱ्या पर्यटकांनी श्रीवर्धन, मुरूड काशीद बिचकडे येणे टाळले असावे, असे स्थानिकांचे मत आहे. पर्यटकांना आवडणारा, भावणारा निसर्गरम्य परिसर असूनही खड्डेमय रस्त्यांमुळे मुरुडची बदनामी वाढीस लागेल, अशी शंका सातत्याने मनातून डोकावत असते. मुरूड समुद्रकिनारा सुशोभीकरण सुरू असून भविष्यात मोठे पार्किंग होणार असले तरी सध्या दिवाळीला पर्यायी व्यवस्था काय, याचे उत्तर मिळत नाही.