लाडकी बहीण योजनेचा सावळागोंधळ

कनेक्टीव्हीचा अभाव, हमीपत्रात सतत बदल

। अलिबाग । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला. विधानसभेतही या फटक्यापासून बचाव करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केल्याची चर्चा होत आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना कनेक्टीव्हीचा अभाव, सर्व्हरची समस्या तसेच हमीपत्रात वारंवार बदल अशा अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत. त्यामुळे या योजनेचा सावळागोंंधळ सुरु असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

राज्य सरकारने एक जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरु केली. सुरुवातीला 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार असे सांगण्यात आले होते. त्यात उत्पन्नाचा दाखला, वय व अधिवास दाखल्याचीदेखील गरज असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे तहसील कार्यालयातही दाखले काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. आपली योजना फेल ठरण्याच्या भीतीने सरकारने त्यात बदल करीत उत्पन्नाचा दाखला, वय व अधिवास दाखल्याची अट रद्द केली आणि 65 वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार असे सांगण्यात आले.

या योजनेसाठी रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा अथवा जन्माचा दाखला, दोन छायाचित्र, बँक पास बुक आणि हमीपत्र आदी कागदपत्रांची पूर्तता करण्याची व्यवस्था केली. मात्र, या योजनेसाठी लागणार्‍या हमीपत्रात आतापर्यंत तीन वेळा बदल करण्यात आला आहे. अगोदरच्या हमी पत्रात राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र नव्हते. त्यामुळे त्यात बदल करून आताच्या हमीपत्रात मुख्यमंत्री व पंतप्रधान यांचे छायाचित्र देण्यात आले आहे. तसेच सेवा केंद्रातही ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा दिला असताना, त्याठिकाणी सर्व्हर व कनेक्टीव्हीची समस्या निर्माण होत आहे. त्याचा परिणाम सेवा केंद्रात अर्ज भरण्याकडे पाठ फिरविली जात नसल्याचे दिसून येत आहे. अंगणवाडी सेविकांवर अर्ज भरण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात गेल्या अनेक दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे इंटरनेट कनेक्टीव्हीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांनाही अर्ज भरताना अडचणी निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात सध्या भातलावणीची कामे सुरु आहेत. महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी अथवा प्रशासनामार्फत होत असलेल्या शिबिरासाठी जावे लागत आहे. त्यामुळे महिलांना भातलावणीच्या कामांसाठी वेळ देता येत नसल्याचे दिसून येत आहे. योजनेच्या सावळागोंधळाचा फटका महिलांना बसत आहे.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची जबाबदारी स्वतः महिलेसह अंगणवाडी सेविका व अन्य यंत्रणेचीदेखील मदत घेतली आहे. मात्र, गावांमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करण्यापासून अर्ज ऑनलाईन भरण्यापर्यंतची प्रक्रिया त्रासदायक ठरत आहे. कित्येक वेळा नेट कनेक्टीव्हीचा अभाव, त्याच सतत पाऊस पडत असल्याने गावांमधील फोनची रेंज गायब होत आहे. त्यामुळे हे अर्ज भरताना फारच वेळ जात आहे. त्यात काही अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही.

अंगणवाडी सेविका
शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी महिलांची लगबग
लाडकी बहीण योजनेसाठी वय अधिवास दाखल्याऐवजी शाळा सोडल्याचा दाखला स्वीकारला जाणार असल्याचे सरकारने घोषित केले. त्यामुळे हा दाखला मिळविण्यासाठी महिलांची लगबग सुरु झाली आहे. जिल्हा परिषद शाळांसह माध्यमिक शाळांमध्ये दाखले घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. हे दाखले वेळेवर देण्यासाठी शिक्षकांचीदेखील दमछाक होत आहे. नियमित कामे सोडून हे दाखले देण्यासाठी शिक्षक कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
Exit mobile version