‘लाडका शेतकरी’ योजना जाहीर करावी: मनोज खांबे

रायगड प्रेस क्लबचा आदर्श शेतकरी पुरस्कार

| वेनगाव | वार्ताहर |

शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. मात्र तो अतीव संकटात आहे, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे चित्र भयावह आहे तेव्हा महाराष्ट्र शासनाने नुकताच अर्थसंकल्प सादर करताना त्यात लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लाडका शेतकरी योजना जाहीर करावी. त्यामुळे थोडा का होईना शेतकऱ्याला मदतीचा हात मिळेल अशी मागणी रायगड प्रेस क्लबकडून आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन रायगड प्रेस क्लब अध्यक्ष मनोज खांबे यांनी केले.

कर्जत येथे रायगड प्रेस क्लबचा उपक्रम असलेला आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. रायगड जिल्ह्यात काम करणारे पत्रकार यांची रायगड प्रेस क्लब हि सामाजिक संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून कृषी दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रगत व शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान त्यांच्याच शेताच्या बांधावर करायचा हि संकल्पना प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष स्व. संतोष पवार यांनी मांडली होती. त्यानुसार सुरु झालेली हि परंपरा गेली 15 वर्ष सुरु आहे. तर हा उपक्रम संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 15 तालुक्यामधील तालुका प्रेस क्लब राबवत असतात. त्यानुसार यंदा जिल्ह्याचा उपक्रम हा कर्जत येथे आयोजित करण्यात आला असून कर्जत प्रेस क्लबने संयोजन केले. दिनांक 4 जुलै डिकसळ प्रतीक्षा लॉन्स येथे सकाळी 11 वाजता आदर्श शेतकरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभाग सचिव अनिल भोळे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने, तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, जितेंद्र पाटील, सागर शेळके, कृषी अधिकारी चिंतामण लोहकरे, मंगेश म्हसकर, शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे, नम्रता कांदळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कर्जत तालुक्यामधील देवपाडा गावातील दामू तुपे, निकोप येथील महिला शेतकरी सारिका झांजे, बिरदोले येथील शेतकरी सतीश कालेकर, पोखरकरवाडी येथील शेतकरी बाजीराव पोखरकर, भानसोली येथील शेतकरी सूर्याजी कडव व चंद्रकांत कडव यांचा आदर्श शेतकरी म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे म्हणाले की, मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे. शेतकऱ्याला शेती करताना काय त्रास सहन करावा लागतो. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा भरलेला आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे म्हणाले. आजही देश शेतीवर अवलंबून आहेच आणि कायम असेल मात्र तरीही ओला, कोरडा दुष्काळ रोग अशा अनेक गोष्टी शेतीत घडूनदेखील शेतकरी अव्वल आहे. आपली गरज भागवून आपण इतर देशाला पुरवठा करतो हे चित्र सुखावह आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही कायम असू अशी ग्वाही रवींद्र मर्दाने यांनी दिली.

Exit mobile version