माथेरानमध्ये पाणीटंचाई आणखी गडद होण्याची चिन्हे
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान येथील शारलोट तलावाच्या घटलेल्या पाण्याच्या पातळीतुन पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. माथेरानच्या शरलोट तलावांमधील आजची पाण्याची पातळी 48 फुटावर येवून थांबली आहे. त्यामुळे तलावामधील पाण्याची क्षमता लक्षात घेता धरणांमधील पाण्याचा साठा कमी होत असल्याने शासनाने नेरळ कुंभे येथून दररोज 20 तास पाणी उचलले नाही तर शारलोट तलाव तळ गाठणार आहे.
माथेरान शारलोट तलावाची पाण्याची पातळी 3 नोव्हेंबर रोजी फक्त 46.20 फूट इतकी आहे. जवळपास 130 दिवसांचा म्हणजेच साडेचार महिन्याचे पाणीपातळीची तूट असून ही अतिशय गंभीर बाब आहे. मागील काही दिवस सतत माथेरानच्या पाणी पुरवठ्याचा भार शारलोट तलावामधील पाण्याच्या वापर केला जात असल्याने उन्हाळा हंगाम येईपर्यंत माथेरानमधील तलावात पाणी राहील काय, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्राधिकरणाच्या अधिकारी यांच्या गचाळ नियोजनामुळे माथेरानमधील पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. आणीबाणीची परिस्थिती ओढवली असून त्यामुळे माथेरानच्या व्यावसायिक, रहिवासी, पर्यटक यांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
माथेरान हे पर्यटनावर अवलंबून असणारे पर्यटन क्षेत्र असून पर्यटन हाच इथल्या स्थानिकांचा एकमेव रोजगाराचे साधन आहे. माथेरानमध्ये होणाऱ्या पाणी पुरवठावर माथेरान पर्यटनाचे आणि इथल्या स्थानिक रहिवासी यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. जर का माथेरानमध्ये योग्य रीतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा झाला नाही तर त्याचा विपरीत परिणाम पर्यटन हंगामावर होऊन स्थानिकांना आर्थिक संकटाला सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे कदाचित स्थानिकांच्या रोषाला सामोरे जायला लागून माथेरानमध्ये कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने युद्धपातळीवर या गंभीर विषयावर तात्काळ बैठक आयोजित करून माथेरानमधील पाणी पुरवठा भविष्यात सुरळीत चालू राहणे कामी आगाऊ नियोजन करण्याची मागणी केली आहे. या बाबतीत संबंधित अधिकारी यांची बैठक घेवून आदेश व्हावेत, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे वतीने शहरप्रमुख प्रसाद सावंत यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
माथेरानमध्ये पावसाळा वगळता अन्य महिने नेरळ येथून उल्हास नदीमधून तब्बल 20 तास पाणी उचलले जाते. त्यामुळे माथेरान शहरातील शारलोट येथील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी मदत होते. मात्र यावर्षी गेल्या महिन्याभरात तलावामधीलच पाणी सतत उचलले जात आहे. त्याचा परिणाम माथेरानमधील तलावाच्या पाण्याच्या पातळीवर झाला आहे. गावात दिवसाआड नळाला पाणी येत आहे. त्यामुळे ग्रामस्थ पाण्यासाठी बैचेन आहेत, अशी टीका माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांनी केली आहे.