लेक लाडकी योजना लाभदायी

| रायगड | वार्ताहर |

माझी कन्या भाग्यश्री ही योजना 2017 पासून राबविण्यात येत होती. या योजने अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर 50 हजार रुपये तसेच दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी 25 हजार रुपये ठेवण्यात येत होते. रायगड जिल्ह्यात या योजने अंतर्गत 487 मुलींना लाभ देण्यात आला आहे.

मुलींचा जन्मदर वाढविणे तसेच मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारी लेक लाडकी योजना मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लाभदायी असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे लाभार्थीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न एक लाखपेक्षा जास्त नसावे), रेशनकार्ड (पिवळे किंवा केशरी), लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील), पालकांचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लेक लाडकी या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये, सहावीत सात हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचीक यांनी दिली आहे.

Exit mobile version