रायगडच्या जिल्हा वाहतूक शाखेची कारवाई
। अलिबाग । प्रतिनिधी ।
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या चालकांना रायगडच्या जिल्हा वाहतूक शाखेने दणका दिला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या एक हजार 368 चालकांविरोधात कारवाई केली आहे. आठ दिवसात 12 लाख 36 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात पर्यटनाबरोबरच औद्योगिकीकरणामुळे नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. अवजड वाहनांसह दुचाकी, चारचाकी, तीन चाकी वाहनांची संख्यादेखील प्रचंड वाढू लागली आहे. जिल्ह्यात वाहनांची संख्या प्रचंड वाढली असली, तरीही काही वाहन चालक बेशिस्तपणे वाहन चालवितात. काही चालक स्टंटबाजी करतात. त्याचा परिणाम रस्त्यावर वाहनांचा अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती केली जाते. वाहने शिस्तबध्द पध्दतीने चालविण्यात यावी, असे आवाहन वारंवार केले जाते. अनेक वेळा वेगवेगळया माध्यमातून सुरक्षेचा संदेशदेखील पोहचविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, काही वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवितात. वेगवेगळ्या सप्ताहाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाते. नियम मोडून वाहन चालविल्याने होणार्या परिणांची माहितीदेखील यातून दिली जाते. तरीही काही वाहन चालक नियम मोडत आहेत. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी रायगड पोलीस दलात जिल्हा वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे काम केले जात आहे. जिल्ह्यात सुमारे 90 वाहतूक पोलीस आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य महामार्गासह जिल्हा मार्गावर वाहतूक पोलीस तैनात केले जात आहेत. हेल्मेट नसणे, वाहन वेगात चालविणे, ट्रिपलसीट असणे अशा अनेक नियम तोडणार्या वाहन चालकांवर लक्ष ठेवून कारवाई केली जाते. जिल्हा वाहतूक शाखेने 18 ते 25 जुलै या आठ दिवसांच्या कालावधीत एक हजार 368 चालकांविरोधात कारवाई केली. त्यांच्याकडून 12 लाख 36 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईतून बेशिस्त चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.