दीपोत्सवाचे जल्लोषात स्वागत; लक्ष्मीपुजनाचा सोहळा उत्साहात

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ईडा, पिडा टळो, बळीराजाचं राज्य येवो, कोरोनाचे संकट नाहीस होऊ दे, अशी मनोमन प्रार्थना करीत अलिबागसह संपूर्ण रायगडात गुरुवारी दीपोत्सवाचे अर्थात दिवाळीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीनेही या दीपोत्सवाची रंगत वाढली.सायंकाळी घरोघरी लक्ष्मीपुजनाचा सोहळाही पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीने दिवाळीचा सण साधेपणानेच साजरा करावा लागला होता.यावर्षी मात्र कोरोनाची साथ काही प्रमाणात आटोक्यात आल्याने सरकारनेही निर्बंध शिथिल केले आणि समस्त नागरिकांनी मनाजोगी दिवाळी साजरी केली.गुरुवारची पहाट अभ्यंगस्नानाने झाली.घरोघरी पणत्यांचा पडलेला लख्ख प्रकाश आसमंत उजऴून टाकत होता.

याशिवाय जोडीला दारोदारी टांगलेले आकाशकंदिल,रंगबिरंगी लाईटच्या माळा सार्‍यांचेच लक्ष वेधून घेत होत्या. अनेक ठिकाणी तर दिवाळी पहाट निमित्त गायन, भजन आदी संगीतमय कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.तेथेही रसिकांनी मोठी गर्दी करीत दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला. लक्ष्मीपुजनानिमित्त बाजारपेठेतही फुले,हार,मिठाई आदींच्या खरदेसाठी मोठी गर्दी झालेली होती. सायंकाळी घरोघरी लक्ष्मीपुजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Exit mobile version