मिनी ट्रेनची मध्य रेल्वेवर लक्ष्मीकृपा

तिजोरीत 29 लाखांची भर
पाच महिन्यात 21 हजार तिकिटांची विक्री !

| माथेरान | वार्ताहर |
पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या माथेरानच्या मिनी ट्रेनला प्रतिसाद मिळत आहे. पाच महिन्यांत माथेरानच्या राणीची 21 हजारांची तिकीटविक्री झाली असून यातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत तब्बल 29 लाखांच्या महसुलाची भर पडली आहे.नेरळ-माथेरान मिनी ट्रेन 22 ऑक्टोबर 2022 रोजी पुन्हा सुरू झाली तेव्हापासून येथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरान हिल स्टेशनवर दाखल होत आहेत. मध्य रेल्वेने माहितीनुसार ऑक्टोबर 2022 ते 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत मिनी ट्रेनच्या 1 हजार 340 व्हिस्टाडोम 1 हजार 849 प्रथम श्रेणी आणि 18 हजार 51 द्वितीय श्रेणीसह एकूण 21 हजार 240 तिकिटांची विक्री झाली आहे.त्यातून 29 लाखांचा महसूल मध्य रेल्वेने मिळविला आहे.त्यामध्ये व्हिस्टा डोम तिकिटांच्या विक्रीतील 9 लाख 29 हजार 340 उत्पन्नाचा समावेश आहे.

आत्ता अलीकडेच मध्य रेल्वेने प्रवाशांच्या फायद्यासाठी माथेरान टॉय ट्रेनला विशेष एसी सलून कोच जोडण्याची घोषणा केली.टॉय ट्रेनला जोडलेला एसी सलून कोच आठ आसनी असेल.नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी आणि रात्रीच्या मुक्कामाच्या बुकिंगसाठी तो उपलब्ध असेल.आगामी सुट्टीचा हंगाम पर्यटकांसाठी फार उत्तम असेल.सलून कोचसाठी इच्छुक येथे बुकिंगकरिता नेरळच्या मुख्य बुकिंग पर्यवेक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Exit mobile version