। जेएनपीटी । वार्ताहर ।
एटीएम सेंटर मध्ये उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने हात चलाखीकरून एका व्यक्तीचे एटीएम कार्ड बदलून तब्बल 1 लाख 8 हजार रूपये लंपास केल्याची घटना उरण, जासई येथे घडली. या प्रकरणी उरण पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात चोरीचा आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव ओमप्रकाश संतराज निशाद आहे.2 जासई गावाजवळील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आपल्या मित्रासमवेत आले होते. हे दोघे एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता तेथे दुसर्या एटीएम मध्ये एक अनोळखी इसम पैसे काढत होता. निशाद यांनी एक वेळा या एटीएममधुन 10 हजार रूपये काढले. मात्र त्याच वेळी त्यांना फोन आल्याने ते एटीएम घेवून बाहेर आले आणि आपल्या मित्राला गणेश सहानी याला एटीएम मधून रक्कम काढण्यास सांगितले. गणेश हा एटीएम मधे कार्ड टाकून पिन विचारण्यासाठी बाहेर आला त्यावेळी या अनोळखी व्यक्तीने त्याचे कार्डबदलले आणि निशादने गणेशला सांगितलेला पिन चोरून ऐकला. थोड्या वेळाने त्यांच्या खात्यातून तब्बल 1 लाख 8 हजार रूपये कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या बाबत उरण पोलिस ठाण्यात या अनोळखी व्यक्ती विरोधात तक्रार नोंदविली आहे.
हातचलाखीने एटीएम बदलून लाख रुपये केले लंपास
