महामार्ग पूर्णत्वास भूसंपादनाचा अडथळा

अजूनही नऊ ठिकाणे मोजणीविनाच

| पेण | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गाचे चौथ्यांदा भूमिपूजन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले खरे; पण महामार्गावरील नऊ ठिकाणचे भूसंपादन न झाल्याने हा दावा कितपत खरा ठरतोय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.


येत्या डिसेंबरला महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काँक्रिटीकरण होणार, तसेच दोन महिन्यांत एक मार्गिका पूर्ण केली जाईल, असे गडकरी यांनी जाहीर केलेे आहे. मात्र, महामार्गाला सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे रस्त्यासाठी जागा संपादित करण्याचा. आजच्या घडीलादेखील नऊ ठिकाणी जागा संपादित करण्याचे शिल्लक आहे. त्यांच्या किमतीदेखील आजही निश्‍चित झालेल्या नाहीत. त्यासाठी मंजुरीदेखील शासनाने दिलेली नाही. त्यातच अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडचे घोंगडे भिजतच आहे. असे असताना नऊ महिन्यांत रस्ता कसा पूर्ण होणार, की हेही आश्‍वासन असेच कोकणवासियांनी समजावे.

2009 पासून 2023 पर्यतचा विचार करता नऊ ठिकाणी जागेचे घोंगडे भिजत आहे. यामध्ये पेण-रामवाडी, कांदळेपाडा, डोलवी, गडब, कासू, कोलेटी, नागोठणे, खांब यांचा समावेश आहे. रामवाडी येथील सर्व्हिस रोड व एका गृहनिर्माण सोसायटीबाबत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी अधिवेशनातदेखील मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, त्यांच्या या मुद्द्याला शासनाकडून योग्य उत्तर दिलेले नाही अथवा रामवाडी येथील सर्व्हिस रोडबाबत शासनाकडून कोणतीच ठोस पावले उचलली गेलीत नाहीत. वाशी नाक्याच्या बायपास रस्त्याचा प्रश्‍न आजही अनुत्तरीत आहे. वाशी नाक्यापासून खारेपाटाचा विचार करता जवळपास 25 ते 30 हजार लोकसंख्येचा हा विभाग आहे.

दरदिवशी पेण शहराकडे साधारणतः चार ते पाच हजार नागरिक ये-जा करतात. त्यांना मोठ्या प्रमाणात येथे बायपास रस्ता न दिल्यास वेळ, पैसा यावर पाणी सोडावे लागेल. पुढे कांदळेपाडा येथील सर्व्हिस रोडसाठी आजमितीला जागा ताब्यात घेतलेली नाही. तसेच कांदळे येथील पुलाचे काम योग्य न झाल्याने गेली दोन पावसाळे कांदळेपाडा गावात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यापुढे डोलवी येथे बायपास रस्त्याची मोठी समस्या आहे. डोलवी गाव मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेला व पश्‍चिमेला विखुरलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ये-जा करणे म्हणजे जिवावर बेतण्यासारखेच आहे. तिच स्थिती गडब येथे आहे. कासू गावाच्या बाजूनेदेखील आजही जागा न संपादित झाल्याने सर्व्हिस रोडचा प्रश्‍न आहे त्याच स्थितीत आहे. पुढे आमटेम-नागोठणेच्या दरम्यातदेखील अनेक ठिकाणी जागा संपादित करण्याची बाकी आहे. तर खांबच्या पुढे असलेल्या पुलाचे काम आजतागायत झालेले नाही. त्यातच अनेक ठिकाणी एक लेंथचे काम झाले आहे, तर दुसर्‍या लेंथचे काम अपुर्‍या स्थितीत तर काही ठिकाणी सुरूच झालेले नाही, अशी स्थिती असताना नऊ महिन्यांत काँंक्रिटीकरणाचे काम पूणर्र् होण्यासाठी जादूची छडीच फिरवावी लागेल एवढे नक्की.

महामार्गाच्या चार मार्गिकेचा प्रश्‍न सुटलेला आहे. सहा मार्गिकांसाठी काही ठिकाणी जागेची मोजणी झालेली आहे. आतापर्यंत जागेची किंमत निश्‍चित झाली नाही, अशी नऊ ठिकाणे आहेत. त्याची किंमत निश्‍चित करून जागा ताब्यात घेतली जाईल आणि जागेचा प्रश्‍न निकाली निघेल.

विठ्ठल इनामदार, प्रांत भूसंपादन अधिकारी
Exit mobile version