आमराई पुलावरील अतिक्रमणे जमीनदोस्त


कर्जत नगरपरिषदेची कारवाई

नेरळ । प्रतिनिधी
कर्जत शहरातील आमराई पूल आणि कोर्ट परिसरात पालिकेच्या जमिनीवर अतिक्रमण करून टपर्‍या बांधून व्यवसाय केले जात होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी कर्जत नगरपरिषदेकडे तक्रारी केल्या होत्या.दरम्यान, पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने त्या दोन्ही ठिकाणी असलेल्या टपर्‍या जमीनदोस्त केल्या असून पुन्हा टपर्‍या बांधून व्यवसाय केल्यास पालिकेकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल असे निर्देश दिले आहेत.
शहरातील आमराई पूल येथील एसटी निवारा शेड च्या बाजूला अनेक महिने अतिक्रमण करून व्यवसाय केले जात होते. अतिक्रमण करून बांधलेल्या टपर्‍या मध्ये केले जाणारे व्यवसायाबद्दल कोणत्याही स्वरूपात कर कर्जत नगरपरिषद प्रशासनाला दिले जात नव्हते. त्या अनधिकृत टपर्‍याबाबत शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांनी तक्रारी केल्या होत्या. त्याचवेळी शहरातील कोर्ट परिसरात देखील हातगाडी लावून फळविक्री सुरू होती आणि त्यामुळे तेथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन तक्रारी स्थानिक परिसरातून पालिकेला प्राप्त झाल्या होत्या.
त्यामुळे कर्जत नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी 14मार्च रोजी शहरातील आमराई आणि कोर्ट परिसरात पाहणी करून अतिक्रमण करून बांधलेल्या टपर्‍या तात्काळ तोडण्यात याव्यात असे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि.15) सकाळीच कर्जत नगरपरिषदचे अतिक्रमण विरोधी पथक तेथे पोहचले आणि त्यांच्याकडून आमराई भागातील अनधिकृत टपर्‍या तोडण्यात आल्या. या टपर्‍यासह कोर्ट परिसरातील फळविक्री गाडी देखील रस्त्यावरून हटविण्यात आली. त्यामुळे कोर्ट परिसरात होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न तात्काळ निकाली निघाला आहे. तर दुसरीकडे शहरातील आमराई परिसरात एसटी निवारा शेड जवळ असलेले अनधिकृत टपरी वजा गाळे तोडण्यात आले. त्यामुळे तेथून प्रवासी गाडीसाठी उभ्या राहणार्‍या स्थानिक यांना दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version