अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंबेरपाडा येथे एका खासगी जमिनीचे सिमेंटचे पोल आणि काटेरी तारांचे कुंपण अज्ञात इसमाने तोडून नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबेरपाडा गावाच्या हद्दीत अलिशा मर्चंट यांच्या मालकीची जमीन आहे. या जमिनीच्या संरक्षणासाठी त्यांनी सिमेंटचे पोल व काटेरी तारांचे कुंपण घातले होते. मात्र, 3 मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता ते 4 मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने या कुंपणाचे सुमारे 20 पोल तोडून नुकसान केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच दिलीप पद्माकर जगताप (59) यांनी कळंब पोलीस चौकीला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. ही घटना कळंब पोलीस क्षेत्राच्या हद्दीतील असल्याने, नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसावी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







