वाघरळ पाड्यावर भूमाफियांचे अतिक्रमण

। पालघर । प्रतिनिधी ।

वसई पूर्वेच्या वाघरळ पाडा येथे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा र्‍हास सुरू असून बेकायदेशीररीत्या बांधकामे केली जात आहेत. स्थानिक आणि महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने निसर्गरम्य वाघरळ पाडा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या परिसरातील नैसर्गिक पाणवठे बुजवण्यात आले असून अगणित झाडांची कत्तल झाली आहे. त्यामुळे परिसराला बकाल स्वरुप आले आहे. पाड्यातील पर्यावरणाचा र्‍हास करणार्‍यांवर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

वसईतील राजवली तालुक्यातील वाघरळ हा आदिवासी पाडा आहे. जंगल आणि हिरव्यागार डोंगरांनी हा परिसर बहरलेला आहे. मात्र, भूमाफियांनी या भागातील पर्यावरण नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. सध्या येथील हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे डोंगर फोडून त्यातील माती उपसाचे काम सुरू आहे. तसेच तेथील दगड अनधिकृतपणे उचलून नेण्यात येत आहेत. तसेच, पाड्यालगतचा संपूर्ण डोंगराळ भाग पूर्णपणे सपाट करून या 70 एकर परिसरात चाळी बांधण्याचे काम सुरू आहे. सध्या तेथील अर्ध्याहून जमिनीवरील झाडे-झुडुपे नष्ट केली आहेत. तेथे भूमाफियांनी कब्जा केल्याचे दिसून येत आहे. यामुळे काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली होती, यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. वसई-विरार शहर हे अनधिकृत बांधकामाचे जणूकाही माहेरघरच बनले आहे.

Exit mobile version