मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक
। लांजा । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड घाटात मोठी दरड कोसळली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी एक बाजू पूर्णपणे बंद होऊन वाहतुकीची मोठी कोंडी झाली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून प्रशासनाची यंत्रणा दरड हटवण्याचे काम वेगाने सुरु आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरड कोसळताना ती महामार्गाच्या संरक्षक भिंतीवर कोसळली आणि त्या भिंती देखील कोसळल्या. या घटनांमुळे महामार्गाच्या संरक्षक भिंतींनाच आता संरक्षणाची गरज असल्याचे चित्र समोर आले आहे. तर या घटनेमुळे महामार्ग ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बांधलेल्या या भिंती अशा प्रकारे कोसळत असतील, तर कामाचा निकृष्ट दर्जा स्पष्ट दिसून येतो, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून उमटत आहे.
मात्र, पावसाळ्यापूर्वीच अशा घटना घडल्याने भविष्यात महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. प्रशासनाने या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



