रायगडची हिरकणी खचली

109 घरांचे नुकसान
महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरी त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये प्रचंड नुकसान झाले. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी वसाहतीला यामुळे धोका निर्माण झाला असून, वाडीकडे जाणारा रस्ता सहा इंचांपेक्षा अधिक खचला आहे. त्याचबरोबर जमीनदेखील दुभंगली असून, दरडीचा धोकादेखील वाढला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या वाडीतील जमीन खचण्याच्या घटना घडत असून, भविष्यामध्ये नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन जीवितहानी होण्याचीदेखील शक्यता निर्माण झालेली आहे.नुकत्याच झालेल्या प्रलंकारी नैसर्गिक आपत्तीमुळे हिरकणी वाडीतील 109 घरांना तडे गेले असून, धोका निर्माण झाला आहे.

मुसळधार पावसामध्ये किल्ले रायगडावरुन पावसाचे पाणी जोरोन वाहात जाते. पाणी वाहून जाण्याकरिता योग्य व्यवस्था नसल्याने पाणी सर्वत्र पसरुन धोका निर्माण होतो. वास्तविक, गटारे बांधून पाण्याचा निचरा करणे आवश्यक असताना शासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाचाडचे माजी सरपंच रघुवीर देशमुख यांनी सांगितले पाचाड, हिरकणीवाडी हा परिसर धोक्याचा झालेला आहे. याठिकाणी संरक्षण भिंती आणि गटारे बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे; परंतु शासनाकडून ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रघुवीर देशमुख यांनी केला आहे.

Exit mobile version