तळेकांटेत भुस्खलनामुळे 13 घरे बाधित


। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
अतिवृष्टीमुळे संगमेश्‍वर तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील तळेकांटे गावातील मांजरेकरवाडी व कळंबटेवाडी भूस्खलनामुळे बाधित झाल्या आहेत. याचा येथील 31 कुटुंबांना फटका बसला असून त्यातील सुमारे 13 कुटुंबातील 42 ग्रामस्थांना जवळच्या समाज मंदिरात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. डोंगर खचलेल्या या भागाची मंगळवारी भूगर्भ शास्त्रज्ञांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबतचा अहवाल काही दिवसानंतर प्राप्त होणार आहे.


संगमेश्‍वर तालुक्यातील तळेकांटे हा गाव डोंगर भागामध्ये असून येथील सेंभवणे या ठिकाणी डोंगर खचला गेला आहे. परिणामी, या गावात असलेल्या दोन वाड्यांना याचा फटका बसला आहे. कळंबटे व मांजरेकरवाडी येथील सुमारे 31 घरे बाधित झाली आहेत. यातील तेरा घरातील 42 सदस्यांना गावातील नजीकच्या कुणबी समाज मंदिरात हलविण्यात आले आहेत. या ठिकाणी देवरुख तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच त्या कुटुंबीयांना आवश्यक तो धान्य साठा देखील पुरविण्यात आला आहे. याबरोबरच मंगळवारी या ठिकाणी भूगर्भशास्त्रज्ञ संदीप माने व सहकारी यांनी भेट देऊन या ठिकाणची पाहणी केली. त्यांच्या समवेत तहसीलदार सुहास थोरात, सरपंच सुरेश गुरव, तलाठी अशोक जाधव, ग्रामसेवक अखिलेश गमरे, पोलिस पाटील सुनिल शिगवण, विजय कळंबटे, मनोज मांजरेकर, संतोष गुरव, अनंत मांजरेकर विलास, मांजरेकर उपस्थित होते.

Exit mobile version