| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील वरंधा घाटात माझेरी गावाजवळ सकाळी दरड पडण्याची घटन घडली होती. ती पडलेली दरड काढून वाहतूक पूर्व पदावर केली असली तरी गणेशोत्सव काळामध्ये या घाटातून वाहतूक चालू राहील का, असा सवाल कोकणवासीयांकडून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला विचारला जात आहे.
रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते व महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यातच बुधवारी (दि.20) सकाळी पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाटातील माझेरी गावाजवळ दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, संबंधित प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही दरड हटवून वाहतूक पूर्ववत केली. मात्र, आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव काळात हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पूर्ववत करेल का, असा सवाल गणेश भक्त विचारीत आहेत. तसेच, पुणे जिल्ह्यात चालू असणाऱ्या कामांमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळामध्ये या रस्त्यावरून वाहतूक चालू करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गांभीर्याने घेईल का, असाही प्रश्न वाहतूकदारांना पडला आहे. कारण या मार्गावरून येणाऱ्या मालवाहतूक व भाजीपाला वाहतूकदारांना हा रस्ता बंद असल्याने मोठा फटका सहन करावा लागत आहे.







