‘इथे’ दरड कोसळून रस्त्यावर

। खेड । प्रतिनिधी ।
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणार्‍या खेड मधील रघुवीर घाटात सहा ते सात ठिकाणी दरडी कोसळल्याची बाब निदर्शनास आली असून त्यामुळे कंदाटी खोर्‍यातील 16 गावांचा जगाशी संपर्क गेल्या पाच दिवसांपासून तुटला आहे. एका बाजूला कोयना धरणाचा विराट जलाशय तर दुसरीकडे रघुवीर घाटात कोसळलेली दरड यामुळे या सोळा गावात कोणाला वैद्यकीय मदतीची गरज भासली तर ती पोहचवण्याची मोठी अडचण निर्माण होणार आहे. ही घटना घडून चार दिवस उलटले तरी अद्याप या घटनेकडे राज्य सरकारने गंभीरपणे पाहिलेले नसल्याची बाब समोर येत आहे. राज्य सरकारने तातडीने त्या सोळा गावात सम्पर्क प्रस्थापित करून तेथे अडकलेल्या शेकडो लोकांना मदतीचा हात तातडीने देण्याची गरज आहे.

सातारा जिल्ह्याच्या नकाशात समावेश असलेल्या कंदाटी खोर्‍याचा सम्पर्क कोयना धरणाच्या जलसाठ्यामुळे तुटला. या खोर्‍यात 16 गावं असून संपर्कासाठी आणि दळण वळण यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील खोपी येथून सुरू होणारा रघुवीर घाटा हा एकमेव मार्ग आहे. परंतु दि 22 रोजी अतिवृष्टीमध्ये रघुवीर घाटाचे मोठे नुकसान झाले आहे. घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून दगड व मातीचे ढीग रस्त्यावर आले आहेत. काही ठिकाणी शंभर ते तीनशे मीटर अंतरात दरड कोसळली आहे तर काही ठिकाणी रस्त्याचाच भाग दरीत कोसळला आहे. त्यामुळे आगामी पंधरा ते वीस दिवस घाटातून वाहतुक सुरू होणे कठीण आहे.

Exit mobile version