| पेण | प्रतिनिधी |
रायगड जिल्हयातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीची घटना घडल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तरणखोप हद्दीतील बारीवाडी या आदिवासी वाडीला लागून असलेल्या डोंगराला तडे जावून मोठ मोठया भेगा पडायला सुरूवात झाल्याने तेथील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झााली आहे. त्यांनी स्थानिक सरपंच व जिल्हा परिषद सदस्य डी.बी.पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी हालचाल करून तहसीलदारांशी संपर्क करून सर्व घटना प्रकरण सांगितले असता बारीवाडीला दरड व भूस्खलनाचा धोका असल्याचे लक्षात घेत तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी तातडीने 150 नागरिकांना स्थलांतरीत केले आहे.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी.बी.पाटील, सामाजिक कार्यकर्त्ये दिनेश पाटील, सरपंच सुनिल पाटील, हनुमान पाटील, संजू पाटील, स्वप्नील पाटील, विशाल गावंड, तसेच ग्रामसेवक तानाजी मेकाले, तलाठी शिवाजी वाभले यांनी सर्व नागरिकांना घेवून गणपती वाडी येथील मराठा समाज भवनात त्यांना तात्पुरते स्थलांतरीत केले आहे.