भूस्खलनाचे तब्बल 93 बळी; 128 जखमी, 400 हून अधिक बेपत्ता
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडवला असून, सोमवारी (दि. 30) मध्यरात्री चार वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 93 जणांचा मृत्यू झाला असून, 128 जण जखमी झाले आहेत. तसेच अद्यापही अनेकजण ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भूस्खलनात चार गावे, रस्ते, पूल आणि वाहनेही वाहून गेली आहेत. भूस्खलनाच्या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केरळमधील वायनाडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास 4 तासांत 3 मोठ्या भूस्खलनाच्या घटना घडल्या. मुंडक्कई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या गावांना भूस्खलनाचा मोठा तडाखा बसला आहे. या गावांमधील शेकडो घरे ढिगार्याखाली गाडली गेली आहेत. एकट्या चुरलमाला येथेच 200 घरांना या दुर्घटनेचा तडाखा बसला आहे. बचावकार्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कन्नूरमधील 225 लष्कारी जवानांना वायनाडला पाठवण्यात आले आहे. यामध्ये वैद्यकीय पथकाचाही समावेश आहे. याशिवाय हवाई दलाची दोन हेलिकॉप्टरही बचावकार्यासाठी पाठवण्यात आली आहेत. मात्र, पावसामुळे दोन्ही होलिकॉप्टर्सना कोझिकोडला परतावे लागले.
सोमवारी केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, ज्यामुळे अनेक भागात मोठी जीवितहानी आणि गंभीर नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. दिवसभर संततधार पाऊस आणि जोरदार वार्याचा परिणाम वायनाड आणि कोझिकोड या उत्तरेकडील जिल्ह्यांवर झाला. वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील डोंगराळ भागात सोमवारी मध्यरात्री भूस्खलन झाले. अनेक घरे मातीच्या ढिगार्याखाली गाढली गेली. मध्यरात्री 2 वाजता आणि पुन्हा पहाटे चार वाजता, असे दोनवेळा भूस्खलन झाले. मुंडक्काई, चूरलमला, अट्टामाला आणि नूलपुझा ही गावे भूस्खलनामुळे प्रभावित भागात आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले. जिल्हा अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबांना विविध छावण्यांमध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा यांनी भूस्खलनात अडकलेल्या लोकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर प्रमुखांशी बोलून भूस्खलनग्रस्त वायनाडमध्ये मदत आणि बचावासाठी सैन्य जमा करण्यास सांगितले आहे. लष्कराचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे. भूस्खलन आणि पावसामुळे चुरमला भागात इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एनडीआरएफ, अग्निशमन, पोलीस आणि महसूल विभागाचे पथक बचावकार्य करत आहे. आतापर्यंत सुमारे 250 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
मृतांच्या वारसांना आर्थिक मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याशिवाय जखमींनाही 50 हजार रुपये जाहीर केले आहेत.