| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड तसेच सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, डोंगरे हॉल, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. महाराष्ट्रात व्यवसायानिमित्त येणाऱ्या परप्रांतीयांची मुले मराठी शाळेत शिक्षण घेतात, मात्र आपल्या राज्यातीलच अनेक कुटुंबे स्वतःची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतात, ही शोकांतिका आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिचा गौरव वाढवणे आणि तिचा वापर वाढवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अलिबागच्या सांस्कृतिक वैभवाच्या जतनामध्ये ग्रंथालयांची महत्त्वाची भूमिका राहिल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी व्यापक वाचन अभियान व ग्रंथालय अभियान राबवण्याची गरज व्यक्त केली. तसेच बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही पुस्तकांशी नाळ जुळलेली राहावी, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सुनील पाटील यांनी मराठी शाळांचे महत्त्व विशद करताना जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने व्यक्तिमत्व विकास अधिक प्रभावीपणे घडतो, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास ममता रोगे, संतोष पेरेकर, अभय हातणकर, हेमंत राऊत, रजिता मालवी, अमित धुमाळ, अपूर्व वर्तक, अंकित म्हात्रे, अभिषेक भगत यांच्यासह साहित्यप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेचा अभिमान बाळगण्यासोबतच तिच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.







