मोहोपाड्यात रिक्षावर झाड पडून मोठे नुकसान

चालक गंभीर जखमी, तिघे किरकोळ
| रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडानजीक भल्या मोठ्या वृक्षाची फांदी रिक्षावर कोसळून मोठा अपघात झाला. त्यात चालक गंभीर जखमी झाला असून, रिक्षातील दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातून दांडफाट्याच्या दिशेने निघालेल्या कंटेनरची मोहोपाडानजीक माणिक जनता पडिक वसाहतीसमोरील भल्यामोठ्या जुनाट वृक्षाला धडक बसल्याने फांदीचा काही भाग कोसळला. यावेळी बारापाडाहून मोहोपाडा शहराकडे निघालेली तीन आसनी सीएनजी रिक्षा माणिक प्रबलजवळ आली असता सदर जुनाट वृक्षाच्या भल्यामोठ्या फांद्या खाली कोसळून एम एच-46, बिडी-6899 या रिक्षावर पडल्या या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून रिक्षाचालक केतन कृष्णा पाटील (35) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, खांद्यालाही दुखापत झाली आहे.तर रिक्षातील दोन प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना ताबडतोब उपचारार्थ हॉस्पिटलात दाखल करण्यात आले.
या रस्त्यालगतच्या फांद्या तोडाव्यात यासाठी अनेकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अर्ज केले आहेत. परंतु, सार्वजनिक बांधकाम खाते जाणूनबुजून कानाडोळा करत असल्याचे दिसून येते. जुनाट वृक्ष पडल्याने कोणाचा जीव गेल्यास संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्रकार राकेश खराडे यांनी केली आहे. या खात्याने पराडे रिस रस्त्यावरील जुनाट वृक्षाच्या फांद्या न हटविल्यास पत्रकार संघटनांच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version