मुरूडच्या मुख्य मार्केटमध्ये हापूसची मोठी आवक

300 ते 400 रुपये डझन; आंबा प्रेमी खुश

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।

यंदा रायगडात अनेक ठिकाणी हापूस आंबा उशिराने विक्रीस आल्याचे दिसून आले. मुरूड मार्केटमध्येदेखील आंबा फारसा आला नव्हता परंतु गेल्या आठवड्यापासून मुरूडच्या मुख्य मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा विक्रीस आला असून भाव देखील घसरले आहेत. हापूस दाखल झाल्याने भाव देखील घसरले आहेत.

मुरूड शहराच्या मुख्य मार्केटमध्ये मजगाव, शिघ्रे, नागशेत, खारआंबोली, विहुर, जोसरांजन, तेलवडे, वरची वाडी, सायगाव, वावडुंगी गावांतून हापूस आंबे मार्केटमध्ये सकाळी विक्रीस येताना दिसत असून सुरुवातीला 700 रूपये भाव असणार्‍या आंब्यांचा डझनाचा भाव देखील 300 ते 400 रुपये इतका खाली आला आहे. हा भाव पक्क्या आंब्याचा असून कच्चे हापूस 200 ते 250 रुपये भावाने मिळत आहेत.

मुरूड मार्केटमध्ये सुभाष कासेकर आणि निलेश कोळवनकर यांनी सांगितले की भाजी मार्केट मध्ये पक्का हापूस आंबा 300 ते 400 रुपये डझनाने विक्री केला जात आहे. मार्केटमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात हापूस, पायरी, रायवळी, बदामी आदी प्रकारातील आंबेदेखील विक्रीस येत आहेत. पायरी आंबे देखील 250 ते 300 रुपये दराने विक्री होताना दिसत आहे.

राजपुरी गावाजवळ खारआंबोली ते आगरदांडा मार्गावर खोकरी घुमट भागात राजपूरी येथील होलसेल आंबा विक्रेते इकबाल इब्राहिम इद्रुस यांच्या आमराईमध्ये आंबा आला असून विक्री सुरू आहे. शिवाय शिघ्रे गावीदेखील हापूस विक्रीसाठी उपलब्ध आहे. राजपुरी-खोकरी येथून मुंबई, पुण्याकडे होलसेल आंबा प्रतवारी करून पाठविला जात आहे. मुंबई- पुण्यातील चाकरमानी मंडळींना आंबा स्वस्त दरात उपलब्ध झाल्याने सर्व जण खुश आहेत.काही दिवसात हे दर अजून खाली येण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version