महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणार्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या माती उत्खनन होत आहे. नाममात्र स्वामित्वधन (रॉयल्टी) भरून तिप्पट उत्खनन होत असून, त्यामुळे शासनाचा हजारो लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. याबाबत तहसीलदार व मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या निदर्शनास आणूनदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
या माती उत्खननाचे महसूल कार्यालयातून रॉयल्टी चलन काढले जाते. मात्र, चलनावर किती ब्रास माती उत्खनन करणार आहे, याची नोंद नसून, केवळ रक्कमच दाखवली जाते. यातून शासनाचा महसूल बुडत असल्याचा आरोप ग्रामस्थ करित आहेत.
सुधागड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभारले जात आहेत. डोंगर पोकरण्यात आले आहे. त्यामुळे भूस्खलनाची एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. सुधागड तालुक्यात ज्या ज्या सजामध्ये विकासकांनी माती उत्खनन केले आहे, त्या उत्खननामुळे कोणत्याही गाव व वस्तीला धोका तर नाही ना, याची चौकशी होणे गरजेचे आहे. सुधागड तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार हे याबाबत लक्ष देतील का? व चौकशी करतील का? याबाबत तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश देतील का? जेणेकरून प्रशासनाला एखादी दुर्घटना घडण्याअगोदर उपाययोजना करता येईल, अशी मागणी जोर धरत आहे.