Landslide! भय इथले संपत नाही…डोंगराच्या पायथ्याशी वसलेले ‘हे’ गाव पुन्हा भीतीच्या

दरडग्रस्त क्षेत्रातील नागरिकांची व्यवस्था दरडग्रस्त जागेत; नागरिक संतप्त
। वावोशी । जतिन मोरे ।
खालापूर तालुक्यातील बीड खुर्द गाव हे डोंगराळ भागात वसले असून हा भाग दरडग्रस्त प्रवण म्हणून ओळखला जातो. या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळून कोणतीही जीवितहानी व वित्तहानी होऊ नये, म्हणून बीड गावातील लोकांची पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांना समाज मंदिर अथवा रायगड जिल्हा परिषद शाळेत वास्तव्यास स्थलांतरित होण्याची नोटीस खालापूर तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परंतू जिल्हा परिषद शाळा आणि समाजमंदिर देखील त्याच दरडग्रस्त भागात असून तहसील प्रशासनाने बीड गावातील लोकांना पाठविलेली ही अजब नोटीस म्हणजे या गावातील लोकांच्या जीवावरच बेतणारी आणि या गावातील लोकांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखेच आहे. त्यामुळे या दरडग्रस्त भागाची पाहणी अभ्यासपूर्ण पद्धतीने केली नसल्याचे या नोटिसीद्वारे उघड झाले आहे.

खालापूर तालुक्यातील बीड खुर्द हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. मागील वर्षी 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) या डोंगराच्या 3 ते 4 ठिकाणी दरड कोसळून मोठमोठे दगड खाली येऊन घरांवर पडता पडता राहिले. त्यावेळी फार मोठी जीवितहानी होण्यापासून टळली होती. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन तुटली होती. तर काही लोकांच्या घरामध्ये डोंगराची माती, चिखल वाहून आल्याने लोक भयभीत झाले होते. आदिवासी वाडीत दोन घरांच्या भिंती कोसळून 2 जण जखमी झाले होते. त्यावेळी देखील खालापूरचे तत्कालीन तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी भेट दिली होती. मात्र कोणताही ठोस असा निर्णय घेण्यात आला नव्हता. या पावसाळ्यात देखील ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती खालापूर तहसील प्रशासनाची असल्याची दिसून येत आहे. या पावसाळ्यात पुन्हा दरड कोसळण्याची टांगती तलवार बीड खुर्द गावावर लटकत आहे.

त्यावेळी डोंगराच्या पायथ्याशी असणार्‍या लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणार असल्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना देणार असल्याचे आश्‍वासन तत्कालीन तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी येथील ग्रामस्थांना दिले होते. ते आश्‍वासन फक्त आश्‍वासनच बनून राहिल्याचे समोर आले आहे. दरड कोसळून या गावाला 1 वर्ष झाले तरी या गावातील स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले नाही किंवा कोणतीही योग्य ती ठोस उपाययोजना देखील करण्यात आलेली नाही. ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. पावसाळा सुरू झाल्यावरच प्रशासनाला जाग येते आणि पावसाळा संपला की प्रशासन पुन्हा झोपी जाते, अशी येथील परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. मागील पावसाळ्यात या गावालगतच्या डोंगराला ठिकठिकाणी भेगा पडल्या असून जमीन खचली आहे. तसेच मोठमोठे दगड डोंगराच्या उतारावर येऊन पडता पडता राहिले आणि आता पडत असलेल्या पावसामुळे येथील डोंगराची माती घसरली असून दगड देखील बाहेर आले आहेत. त्यामुळे हा पावसाळा म्हणजे येथील लोकांची जीवघेणी परीक्षा घेण्यासारखेच आहे.

आपत्ती काळात तहसील प्रशासनाने नागरिकांची यवस्था समाजमंदिर अथवा जिल्हा परिषद शाळेत करण्याचे सांगितले आहे. परंतू दोन्ही ठिकाणे ही दरडग्रस्त भागातच आहेत. त्यामुळे हा पाहणी दौरा व्यवस्थित केला नसल्याचे उघड आहे.

– गणेश केदारी – ग्रामस्थ, बीड खुर्द

पावसाळा सुरू झाला असून अद्याप सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. गावाची अवस्था तळीये किंवा माळीन गावासारखी झाल्यावर प्रशासन येणार का ? –

-भाग्यश्री केदारी, बीड खुर्द

हे गाव डोंगराच्या पायथ्याशी असुन या भागात कोणत्याही प्रसंगी दरड कोसळून जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा अहवाल ग्रामपंचायतीने मागील वर्षी पाठविला आहे. परंतू प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही.

भाऊ पवार – सदस्य, ग्रामपंचायत बीड खुर्द

Exit mobile version