स्व. नमिता नाईक अलिबागची अस्मिता

। भारत रांजणकर । अलिबाग ।
अलिबागकरांच्या मनातील अस्मिता जागी करणार्‍या अलिबागच्या माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांची अलिबागकरांची एक हक्काचा माणूस म्हणून ओळख निर्माण झाली होती. कुठलेही संकट असो कि समस्या तेथे स्वतः पोहचून मदत करणार्‍या नमिता नाईक यांना अलिबागकरांनी देखील विशेष प्रेम दिले. अलिबागचे नाईक घराणे हे सुसंस्कृत व प्रतिष्ठित घराणे. या नाईक कुटुंबात सन 1941 ते 1942 साली रामराव न. नाईक सन 1944 ते 1946 अनंत न. नाईक हे नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. त्यानंतर सुनिता नाईक प्रथम उपनगराध्यक्ष नंतर थेट निवडणुकीतून नगराध्यक्ष, प्रशांत नाईक त्यानंतर नमिता नाईक यांनी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषविले. 2006 च्या नगरपालिका निवडणुकीत नमिता नाईक चांगल्या मताधिक्यांनी नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्या प्रशांत नाईक यांच्या पत्नी. या कालावधीत प्रशांत नाईक व नमिता नाईक नगरसेवक व नगरसेविका म्हणून कार्यरत होते. प्रशांत नाईक अध्यक्ष झाले, तर नमिता नाईक विषय समितीच्या सभापती झाल्या. या दोघांनीही आपल्या कामाचा चांगला ठसा उमटविला. 2011 च्या नगरपालिका निवडणुकीत हे दोघेही पुन्हा चांगल्या मताधिक्यांनी निवडून आले. आरक्षणांमुळे बिनविरोध नगराध्यक्षपद नमिता नाईक यांना मिळाले. अलिबागेतच जन्मलेल्या अलिबागेतच शालेय व महाविद्यालयीन शिक्षण बी.ए.पर्यंत घेतलेल्या नमिता नाईक यांनी आपल्याला मिळालेल्या नगराध्यक्षपदाच्या संधीचे काही दिवसांतच सोने करुन दाखविले.


अलिबाग नगरपालिकेच्या महिला, बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून कार्यरत असताना नमिता नाईक यांनी अलिबागमधील महिला मंडळे, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे, दिवाळीनिमित्त महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन भरविणे, महिलांसाठी निरनिराळी शिबिरे घेणे, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत त्यांचा हातखंडा आहे. विविध पदांवर काम करीत असताना त्यांची अभ्यासू वृत्ती, जनसंपर्क, वचक यासारख्या अनेक बाबी उल्लेखनीय स्वरुपाच्या होत्या. त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना प्रत्येक नागरिकांसोबत हसतमुखाने संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्यात त्यांना आनंद वाटत असे. मितभाषी आणि हसतमुख असणार्‍या स्व. नमिता नाईक यांचे रणरागिणीचे रुप देखील नागरिकांच्या हक्कासाठी पहायला मिळाले. ङ्गअलिबागसे आया है क्याफ या संवादाविरोधात त्यांनी आक्रमक होत अलिबागमधील सर्वपक्षीयांना एकत्रित करुन लढा उभारला. त्यासाठी अनेक उपक्रम राबविले. या उपक्रमांना रायगड जिल्ह्यातून देखील चांगला प्रतिसाद मिळाला. त्यासाठी त्यांनी न्यायालयीन लढा देखील लढला. असे एक ना अनेक आठवणींनी अलिबागकरांच्या मनात कायम जिवंत असणार्‍या नमिता नाईक यांच्या अवचित जाण्याने अलिबागकरांना मोठा धक्का बसला. हेलावून गेलेले अलिबागकर त्यांच्या स्मृती सदैव मनात जपत आहेत. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली!

Exit mobile version