। पोयनाड । विजय चवरकर ।
रायगड जिल्हा कबड्डी असो. मान्यतेने कबड्डीपटू स्व. सिकंदर केळकर मित्र मंडळाच्या वतीने केळकर यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी 25 मे रोजी बांधण येथे व्यावसायिक खुल्या गटाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत डोलवीच्या जेएसडब्ल्यू संघ स्व. सिकंदर केळकर चषकाचा मानकरी ठरला.स्पर्धेमध्ये निमंत्रित आठ संघांनी सहभाग घेतला होता.
बांधण येथील सिकंदर केळकर शिवाई क्रीडा मंडळ बांधण संघाचा अष्टपैलू खेळाडू कबड्डी प्रशिक्षक बळवंत सिरसेकराच्या मार्गदर्शनाने शिवाई बांधण संघ रायगड जिल्ह्यात नावारुपाला आला.त्यामध्ये सिकंदर केळकरचा सिंहाचा वाटा होता. जिल्हा अजिंक्यपद तसेच जिल्ह्यातील अनेक स्पर्धेमध्ये त्यांच्या संघाने विजेतेपद मिळविले. सिकंदर केळकर याने कुमारगट खुल्या गटातून जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले. राज्य संघातूनही जिल्ह्याकडून तो खेळला. सर्वांचा लाडका खेळाडू मोठ्या आजाराने हे जग सोडून गेला. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
बारा लाखांचा निधी
स्पर्धेच्या माध्यमातून जमा झालेल्या बारा लाख सहा हजारांच्यावर आर्थिक निधी सिकंदर केळकरच्या कुटुंबाला सहकार्य म्हणून देण्यात आला.
स्पर्धेचे उद्घाटन माजी राजिप सदस्य अॅड.आस्वाद पाटील यांच्या हस्ते आणि माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेला आ. प्रशांत ठाकूर प्रमुख अतिथी उपस्थित होते. जि.प. सदस्य दिलीप भोईर, माजी जि.प.स. चित्रा पाटील, छत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डी खेळाडू सागर बांदेकर, विलास जाधव, तसेच प्रो. कबड्डी स्टार खेळाडू ऋतुराज कोरवी यांनी उपस्थिती नोंदवली.
स्पर्धेमध्ये जे.एस.डब्ल्यू डोलवी प्रथम क्रमांक, स्टार रिवायडींग रोहा द्वितीय युवराज टाक स्पोर्टस वायशेत, तृतीय क्र खुषबू आईस्क्रिम आणि चतुर्थ क्र. सांघिक विजेते संघ ठरले. तसेच प्रेक्षक हिरो स्वप्नील वेळे रोहा, उत्कृष्ट खेळाडू राज पाटील, डोलवी, उत्कृष्ट चढाई अजय मोरे, रोहा उत्कृष्ट पकड सुचित पाटील, डोलवी, वैयक्तिक पारितोषिकांचे मानकरी ठरले.स्पर्धेत रायगड जिल्हा कबड्डी असो. कडून संजय मोकल, जे.जे. पाटील, जनार्दन पाटील यांचे सहकार्य लाभले. रायगड जिल्हा कबड्डी असोच्या पंचांनी कोणत्याही प्रकारचे मानधन घेतले नाही.
कृषीवल… एक हात मदतीचा
धुरंधर कबड्डीपटू स्व. सिकंदर केळकर याचे निधन झाले. अल्पवयातच निधन झाल्याने संपूर्ण जबाबदारी पत्नी श्वेता केळकर यांच्यावर आली. पतीच्या जाण्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आणि संपूर्ण कुटूंब आर्थिक संकटात सापडले. जिल्ह्याचे विशेषतः बांधणचे नाव उंचावणार्या सिकंदर केळकरच्या कुटूंबियांना, त्यांच्या चिमुकल्या लेकरांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे लक्षात येताच कृषीवलने एक हात मदतीचा असे आवाहन करीत केळकर परिवाराला मदत करण्याचे आवाहन समाजातील क्रीडाप्रेमी तसेच सामाजिक,दानशूर व्यक्तींना केले.त्या आवाहनाला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.