पेण तळे येथे पुस्तकपेढी योजनेचा शुभारंभ

| माणगाव | प्रतिनिधी |

कोरोना महामारी काळात गरजूंना शिक्षणाच्या प्रवाहात सहाय्यभूत व्हावे या हेतूने सुरू करण्यात आलेल्या मारुती फाऊंडेशनच्या पुस्तकपेढी योजनेचा मंगळवारी (दि.21) पेण तळे येथे शुभारंभ करण्यात आला. पुस्तकपेढी योजनेचे हे चौथे वर्ष असून यावर्षी फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध शैक्षणिक साहित्याची मदत गरजूंना देण्यात येणार आहे.

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी हा उद्देश ठेवून इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात वर्षभरासाठी पूर्णपणे मोफत पाठ्यपुस्तक संच भेट दिला जातो. वर्षभर संच वापरल्यानंतर फाऊंडेशनकडे परत केला जातो. सदर संच दुसऱ्या विद्यार्थ्यांना वापरण्यास मिळतो. त्यामुळे विद्यार्थी पालकांना वेळेत पुस्तके मिळतात व खरेदी करण्याचा आर्थिक भार हलका होत आहे. आजपर्यंत गेल्या चार वर्षात 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

पेण तळे येथे गावाचे उपाध्यक्ष सीताराम पोटले, सामाजिक कार्यकर्ते मंगेश भागडे, नयन पोटले, नारायण मोंडे, प्रकाश मांडवकर, साईनाथ पोटले व फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित शेडगे यांच्या हस्ते या योजनेचा या शैक्षणिक वर्षातील शुभारंभ करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या अनुया आपटे, निर्धार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश अहिरे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद उभारे, किशोर वेदपाठक, नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.दीपक देशमुख, भालचंद्र खाडे, शंकर शिंदे, सुशील कदम आदी मान्यवरांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या योजनेसाठी बाळाराम मांडवकर, सुमित मोंडे, अरुणा मांडवकर, अनघा शेडगे यांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शन लाभत आहे.

Exit mobile version