तोडकरी हॉस्पिटल येथे शेकापक्षाच्या प्रयत्नातून मोफत लसीकरण केंद्राचा शुभारंभ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाची साखळी मोडण्यासाठी लस घेणे खूप गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असून लॉकडाऊन केले तर लोकांवर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ येऊ शकते. कोरोना प्रतिबंधक लस जिव वाचवते. मात्र लसीचा मोठया प्रमाणात तुटवडा आहे. गावोगावी लस पोहचलेली नाही. हे लक्षात घेता शेतकरी कामगार पक्षाने मोफत लसीकरण मोहिम सुरु केली आहे. ऑफलाईन पद्धतीची असणारी ही लसीकरण मोहिम गावपातळीनुसार सुरु करण्यात आली आहे. रोज प्रत्येक गावातील 80 लोकांना लस देण्यात येणार आहे. गावासाठी प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिली.
या लसीकरण उपक्रमासाठी शेकापक्षाचे अनेक स्वयंसेवक तत्पर असतात. ही लसीकरण सेवा मोफत असून खेडोपाड्यातील ग्रामस्थांना लसीकरण केंद्रावर पोहचण्यासाठी मोफत बससेवेची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रासाठी डॉक्टर, परिचारीका, प्रशिक्षीत कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. लसीकरणापूर्वी ताप, रक्तदाब अशा योग्य त्या आरोग्य तपासणी केल्या जातात. अत्यावश्यक परिस्थितीत लाभार्थ्याला रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही लस उपलब्ध करुन देण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे. यात शेकापक्षाचे स्वयंसेवक, सोबो इस्टेट डेव्हलपमेंट प्रा. लिमिटेड, पीएनपी मेरिटाईम सर्व्हीस, पीएनपी एज्युकेशन सोसायटी, गंधार ऑईल, हॉटेल मॅपल आयव्ही, शेकाप आरोग्य सेल, आयएसएल कोल अ‍ॅन्ड मायनिंग, यांचा यात समावेश आहे.
तोडकरी हॉस्पिटल श्रीबाग येथे अलिबाग तालुक्यातील गावांना मोफत लसीकरण करण्यात येणार्‍या लसीकरण केंद्राचा आज छोटेखानी कार्यक्रमात अ‍ॅड निता पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी राजेंद्र पाटील, संजय म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते. सदर लीसकरण केंद्राला शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड आस्वाद पाटील आदी मान्यवर भेट देणार आहेत. आज पहिल्या दिवशी सहाण गावात 80 जणांना लस देण्यात आली.
आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षातर्फे चित्रलेखा पाटील यांच्यामार्फत कोरोना काळात मोफत कोविड केयर सेंटर, ऑक्सिजन चा मोफत पुरवठा, गरजूंना अन्नधान्य, त्याचप्रमाने रोज 500 गोरगरीब लोकांना मोफत दोन वेळचे सकस जेवण देऊन मोलाचे कार्य केले.
या लसिकरण मोहिमेत गावानुसारच लस देण्यात येणार असल्याने त्यानुसार संपर्क साधुन नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे. हे लसीकरण ऑफलाईन पद्धतीने करण्यात आलेले आहे. यामध्ये रोज 80 लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. एका दिवसाला एक गाव निवडण्यात येणार आहे. प्रत्येक गावाला प्रतिनीधी नियुक्त करण्यात आला असून त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर लाभार्थ्यांना डोस मिळणार आहे. त्याचबरोबर पीएनपी ग्रुपतर्फे मोफत बससेवा देखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. पीएनपीच्या बस गावा गावात येऊन लाभार्थ्यांना तोडकरी लसीकरण केंद्रावर घेऊन येतील आणि लसीकरण पुर्ण करतील. हा उपक्रम दोन ते तीन महिने सुरु ठेवण्याचा मानस असणार आहे. लस घेतल्यानंतर देखील कोराना होऊ शकतो मात्र त्याची तीव्रता कमी होऊन निश्‍चितच जीव वाचू शकतो असा विश्‍वास व्यक्त करीत चित्रलेखा पाटील यांनी प्रत्येकाने शिस्तपध्दतीने या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून सहाण गावापासून सुरुवात करण्यात आली. दुसर्‍या दिवशी 2 सप्टेंबर रोजी सहाणगोठी, 3 सप्टेंबर रोजी चेंढरे, 4 रोजी पेझारी, 5 ला आंबेपूर, 6 तारखेला चरी तर 7 सप्टेंबर रोजी हाशिवरे या गावातील लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरणाचा लाभ दिला जाणार असून दुसरा टप्पा गणपतीनंतर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

Exit mobile version