“शहीद अशोक कामते बॅडमिंटन कोर्ट”चा शुभारंभ

पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते उद्घाटन
| खोपोली | प्रतिनिधी |
शहीद अशोक कामते यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असता त्यांच्यात दडलेल्या खेळाडूला मी जवळून अनुभवले आहे, किंबहुना मी त्यांना मी गुरुस्थानी मानत आहे. त्यामुळे शहीद अशोक कामते यांच्या नावे बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन माझ्या हस्ते होणे म्हणजे माझे भाग्य असून, सार्थ समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी खोपोली पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर छोटेखानी कार्यक्रमात बॅडमिंटन कोर्टच्या बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटनाआधी पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि खालापूर उपविगीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते, वास्तु उभारणीसाठी देणगी दिलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे रसायनी व खालापूर या ठिकाणचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. कोणत्याही अधिकार्‍याने आपल्या कार्यकाळात कर्तृत्वाचा ठसा उमटविण्याचे काम केले पाहिजे, हे सूत्र लक्षात घेऊन खोपोलीचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी पोलिसांच्या फिटनेसकडे कटाक्ष ठेवत बॅडमिंटन कोर्ट उभारले आणि बहुउद्देशीय सभागृहाचे जे निर्माण केले, ते आदर्शवत आहे. या उपक्रमात कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने घेतलेली मेहनत, पंचक्रोशीतील कंपन्यांनी केलेले आर्थिक सहाय्य खर्‍या अर्थाने कौतुकास्पद आहे, असे मत अशोक दुधे यांनी व्यक्तकेले. शासनाच्या निधीतून उपक्रम राबवणारे अनेक अधिकारी आहेत; परंतु लोकसहभागातून अशा उपक्रमांचे निर्माण करण्याची किमया क्षीरसागर यांनी करून दाखवल्याबद्दल कौतुक केले. क्षीरसागर हे उत्कृष्टपणे आपला कार्यकाळ पूर्ण करून लवकरच बदलीच्या ठिकाणी जात असल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी, तर सूत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस उपनिरीक्षक सतीश आस्वर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version