| माथेरान | वार्ताहर |
मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांची अपार मेहनत आहे. नुकताच मुख्यमंत्री माझी लाडकी शाळा या अभियानात माथेरानच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. या शाळेला अकरा लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले होते. यातूनच या शाळेचा संपूर्ण कायापालट करून पूर्णतः शाळेचे रुपडे पालटले आहे. या शाळेतील डिजिटल सुविधा, मुलांना सायकल प्रशिक्षण त्याचप्रमाणे अन्य उपक्रमांचा शुभारंभ प्रशासक राहूल इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी समूहगीते, नृत्य सादर केले. संपूर्ण शाळेला संरक्षण नेट बसविण्यात आल्या आहेत. तर आजूबाजूचा परिसर नियमितपणे स्वच्छ राखला जात आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या या शाळेत सर्वसामान्य नागरिकांची मुले शिक्षण घेत असून त्यांना वेळेवर सकस आहार दिला जात आहे. शौचालय व्यवस्था, क्रीडांगण तसेच मनमोकळेपणे अभ्यास करण्यासाठी प्रसन्न परिसर आहे. त्यामुळे यावर्षी पहिलीच्या वर्गात प्रवेश करून चांगली पटसंख्या पालकांनी दिलेली आहे.
माथेरानमधील प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांचा शुभारंभ
