नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
न्यूझीलंड ऑलिम्पिक समितीने 87 किलो वजनावरील गटात ट्रान्सजेंडर असलेल्या लॉरेल हबार्डची निवड केली आहे. त्यामुळे येत्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी लॉरेल हबार्ड ही पहिलीच ट्रान्सजेंडर स्पर्धक म्हणून इतिहास घडवणार आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2015 साली काही नियमांमध्ये बदल केला होता. त्यामध्ये सांगितलं होतं की, ट्रान्सजेंडर स्पर्धकाचे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण हे मर्यादित असून, त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत नाही. त्यामुळे ट्रान्सजेंडर स्पर्धकांना महिलांच्या गटातून भाग घेण्यात काही हरकत नाही. या नियमाच्या आधारे लॉरेल हबार्डची निवड करण्यात आली आहे.
लॉरेल हबार्डने या आधी अनेक जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतला असून त्यामध्ये विविध पदकंही मिळवली आहेत. लॉरेल हबार्डचे आताचे वय हे 43 वर्षे इतकं असून, आठ वर्षांपूर्वी तिच्या हार्मोन्समध्ये बदर झाल्याचं सांगण्यात येत आहे. आपल्याला अशी संधी मिळाल्याने आपण सर्वांचे आभारी आहोत, अशी भावना लॉरेल हबार्डने व्यक्त केली आहे.