| क्रीडा | प्रतिनिधी |
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रवींद्र चवरकर स्मृतिचषक एकदिवसीय 40 षटकांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यात लावास क्रिकेट क्लब पनवेल संघाने पोयनाड संघावर 57 धावांनी विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल जिंकून लावास क्लब पनवेल संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. 40 षटकांच्या समाप्तीनंतर 186 धावा धावफकावर लावल्या. त्यामध्ये आयुष पाटीलने सर्वाधिक 59, अनुराग कुलकर्णीने 16 धावांचे योगदान दिले. पोयनाड संघाकडून गौरांश सिंगला 5 तर सौम्य केणी याने 3 फलंदाजांना तंबूत धाडले.
प्रत्युत्तर देताना पोयनाड संघाकडून 40 षटकांत 129 धावाच धावफकावर लागल्या. दक्ष आवळे याने एकाकी झुंज देत 26 धावा काढल्या. पनवेल संघाकडून आयुष पाटील 3, अनुराग कुलकर्णी याने 2 फलंदाज बाद केले. पनवेल संघाने सामना 59 धावांनी जिंकला.अष्टपैलू खेळाडू आयुष पाटीलला सामनावीर, दक्ष आवळे स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, गौरांश सिंगला इमार्जिंग प्लेयर, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अद्वैत मोरे, प्रज्वल पराडकर यांना झुंझारचे सचिव किशोर तावडे, अजय टेमकर, प्रतिक मोहिते, सागर कांबळे, पराग घरत, मनोहर गोपाळे, संदीप पाटील, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.






