| कोल्हापूर | प्रतिनिधी |
प्रशांत कोरटकरला आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश एस.एस. तट यांच्यासमोर दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. त्यानुसार, आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड.सूर्यकांत पोवार तसेच, इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे अॅड. असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले होते. तर, प्रशांत कोरटकर याच्यातर्फे अॅड. सौरभ घाग प्रत्यक्ष उपस्थित होते.
पोलिसांनी खबरदारी म्हणून कोर्टाच्या परिसरामध्ये कुणालाही या ठिकाणी येऊ दिलं नव्हतं. जो वकील होता तो सकाळपासून या ठिकाणी कोल्हापूर न्यायालयाच्या पूर्ण आवारामध्ये फिरत होता. अमित कुमार भोसले असे त्यांचे नाव आहे. जे मूळचे रुकडी मधले राहणारे आहेत. ज्यावेळी सुनावणी पूर्ण झाली, युक्तिवाद झाला आणि ऑर्डर द्यायच्यावेळी तो खाली जाऊन थांबला. जशी ऑर्डर आली, तसं पोलीस कोरटकरला खाली घेऊन गेले. त्याचवेळी या वकिलाने प्रशांत कोरटकरवर हल्ला केला.