जिंदाल रुग्णालयात हलगर्जीपणा

मुख्य वैद्यकीय अधिकार्‍यासह दोन डॉक्टर्सबाबत तक्रारी
। नागोठणे । वार्ताहर ।

सुकेळी येथील बी.सी. जिंदाल चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल परमार व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी असलेली त्यांची सून डॉ. कृतिका परमार या जोडगोळीकडून रुग्णांच्या बाबतीत अक्षम्य हलगर्जीपणा सुरु आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे भविष्यात जर कुणाचा नाहक जीव गेल्यास जिंदाल रुग्णालय व्यवस्थापन जबाबदार असेल. त्यामुळे या दोन्ही डॉक्टरांना त्वरित हटविण्याची मागणी ऐनघर ग्रामपंचायतीकडून एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर सरपंच कलावती राजेंद्र कोकळे व ग्रामविकास अधिकार्‍यांची सही आहे. या डॉक्टर जोडगोळीविरोधात रुग्ण व नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जिंदाल रुग्णालयातचे मुख्य वैद्यकीय अधिकारी गोपाल परमार यांनी रुजू होताच 1-2 महिन्यातच सुनबाई डॉ. कृतिका परमार यांनाही रुग्णालयाच्या सेवेत रुजू करून घेतले. मात्र असे असतानाच मुख्य वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून रुग्णांना आवश्यक ती सेवा देण्यास डॉक्टर जोडगोळी अपयशी ठरली.

मिळालेल्या माहितीनूसार नामदेव लाड यांना उपचारासाठी घेऊन गेलेले ऐनघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोहिदास लाड यांनाही वडिलांच्या उपचारात या डॉक्टर जोडगोळीकडून वाईट अनुभव आला. उपसरपंच रोहिदास लाड हे वडिलांसोबत असतानाही कृतिका परमार यांनी त्यांच्याशी उद्धटपणाची भाषा वापरली. त्यामुळे जर स्थानिक लोप्रतीनिधीच्या बाबतीत असे प्रकार घडत असतील तर इतर सर्वसामान्य व गरीब रुग्णांची काय अवस्था, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

नातेवाईकांची भरती
जिंदाल समूहाकडून सुरु करण्यात आलेल्या रुग्णालयात व जिंदाल माउंट लिटल झी स्कूलमधील विविध पदांच्या नोकरीत गेल्या काही वर्षांपासून जिंदाल कंपनीतील मोठ-मोठ्या अधिकार्‍यांच्या व आपापसांतील नातेवाईकांचाच भरणा केला जात आहे. पात्रता असूनही स्थानिकांना डावळले जात असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात या रुग्णालयाचे व्यवस्थापक जयराम नडार यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Exit mobile version